IND vs BAN R Ashwin and his wife Prithi interview shared by BCCI : अनुभवी भारतीय क्रिकेटपटू रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. चेन्नईमध्ये घरच्या मैदानावर खेळताना, अश्विनने बॅट आणि बॉल या दोन्हीमध्ये चमकदार कामगिरी केली आणि संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या सामन्यानंतर बीसीसीआयने सामनावीर अश्विनसह त्याच्या कुटुंबासोबतचा मैदानावरील अनमोल क्षण शेअर केला आहे. बीसीसीआयने शेअर केलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओत अश्विन आणि त्याची पत्नी एकमेकांशी बोलताना दिसत आहेत.
अश्विन आणि त्याची पत्नी प्रीतीची मुलाखत –
बीसीसीआयने शेअर केलेल्या मुलाखतीच्या व्हिडीओमध्ये अश्विन त्याची पत्नी प्रीती आणि दोन मुलींसोबत दिसत होता. या जिव्हाळ्याच्या कौटुंबिक मुलाखतीदरम्यान प्रीतीने अश्विनला एक मजेदार प्रश्न विचारला. जो त्यांच्या मुलींना खूप आवडला. ‘डॉटर्स डे’ला तुम्ही मुलींना काय गिफ्ट द्याल? यावर अश्विनने मजेशीरपणे उत्तर दिले. तो म्हणाला, ‘ज्या चेंडूने मी पाच विकेट्स घेतल्या, तो चेंडू मी त्यांना देईन.’हा व्हिडीओ चाहत्यांना खूप आवडत आहे.
प्रीती इथेच थांबली नाही. तिने अश्विनच्या कसोटीदरम्यान, विशेषतः घरच्या मैदानावरील कामगिरीबद्दल त्याला कसं वाटतंय विचारलं. यावर अश्विन म्हणाला, ‘यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे मला कळत नाही. पहिल्या दिवशी काही गोष्टी खूप पटकन घडल्या. ज्यामुळे मला फलंदाजीसाठी मैदानात लवकर यावे लागले. मी येथे शतक झळकावेल, असे मला वाटले नव्हते. पण शतकानंतर खूप छान वाटतं आहे. प्रत्येक वेळी जेव्हा मी घरच्या मैदानावर खेळायला उतरतो, तेव्हा तो क्षण माझ्यासाठी खास असतो.’ अश्विनच्या उत्तरावरून त्याचा खेळाशी भावनिक संबंध असल्याचे दिसून येते. तसेच चेन्नईच्या मैदानाचा प्रभाव त्याला प्रेरित करतो.
प्रीतीने अश्विनला विचारला मजेशीर प्रश्न –
मुलाखतीदरम्यान प्रीतीने स्वत:कडे बोट दाखवत विचारले, ‘या ‘एनर्जी’मुळे तुमची एनर्जी वाढली आहे, असे वाटते का?’ या प्रश्नावर अश्विनने म्हणाला की, त्याची पत्नी प्रीतीची वारंवार एक तक्रार आहे. तिला असे वाटते की सामन्यादरम्यान तो तिच्याकडे क्वचितच पाहतो. त्याच्या मुलींनाही असंच वाटते. अश्विन म्हणाला, ‘मी त्यांना पहिल्या दिवशीही पाहिले नाही. माझ्यासाठी, मी खेळत असताना कुटुंबाची काळजी घेणे खूप कठीण आहे, परंतु मी माझ्याकडून सर्वोत्तम प्रयत्न करतो.’