IND vs BAN 1st Test Ravichandran Ashwin registers world record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना एमए चिदंबरम स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात भारताची सुरुवात खूपच खराब झाली होती. भारताने ३४ धावांत तीन विकेट्स गमावल्यानंतर संघाची अवस्था बिकट झाली आणि १४४ धावांपर्यंत संघाच्या सहा विकेट पडल्या. येथून अश्विनने नाबाद १०२ धावांची खेळी साकारत भारतीय संघाला अडचणीतून बाहेर काढले. या खेळीदरम्यान अश्विनने एक मोठा पराक्रम केला आहे, ज्यामुळे तो जगातील पहिला खेळाडू ठरला आहे.
रविचंद्रन अश्विन आता कसोटीत ५०० पेक्षा जास्त विकेट्स घेणारा, १४ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा करणारा, ३६ वेला पाचपेक्षाा जास्त विकेट्स घेणारा, तसेच कसोटीत सहा शतके झळकावणारा जगातील पहिला खेळाडू ठरला आहे. या बाबतीत अश्विननंतर इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड दुसऱ्या स्थानावर आहे, ज्याने कसोटीत ६०४ विकेट्ससह १४ वेळा पन्नास पेक्षा जास्त धावा केल्या आहेत.
अश्विनने कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले –
एमए चिदंबरम स्टेडियमवर बांगलादेशच्या गोलंदाजांचा मुकाबला करत अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले. संघ संघर्ष करत असताना अश्विनने अवघ्या १०८ चेंडूत शतक झळकावले. अश्विनच्या खेळीत दहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
शतक पूर्ण केल्यानंतर अश्विन सातव्या क्रमांकावर किंवा त्याखालील क्रमांकावर फलंदाजी करताना भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सामील झाला आहे. त्याच्याप्रमाणेच महान अष्टपैलू कपिल देव आणि माजी कर्णधार एमएस धोनी यांनीही ही कामगिरी केली आहे. या दोन्ही महान खेळाडूंनी भारतात ४ शतके झळकावली आहेत. आता अश्विन देखील यादीत सामील झाला आहे.
हेही वाचा – IND vs BAN : यशस्वी जैस्वालचा मोठा पराक्रम! जॉर्ज हेडलीचा ८९ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडत लिहिला इतिहास
रविचंद्रन अश्विनने कारकिर्दीतील सर्वात जलद शतक –
रविचंद्रन अश्विनने बांगलादेशविरुद्ध कारकिर्दीतील पहिले शतक अवघ्या १०८ चेंडूत पूर्ण केले. अशाप्रकारे हे शतक त्याच्या कारकिर्दीतील सर्वात वेगवान कसोटी शतकही ठरले आहे. याआधी त्याने २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ११७ चेंडूत सर्वात वेगवान कसोटी शतक झळकावले होते. या खेळीने अश्विनने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की तो कसोटी क्रिकेटमधील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक का आहे.