IND vs BAN Ravichandran Ashwin equals Muttiah Muralitharan’s record : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळला गेला. जो भारतीय संघाने पाचव्या दिवशी ७ गडी राखून जिंकला आणि मालिकाही २-० ने खिशात घातली. त्याचबरोबर मायदेशात सलग १८वी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने एक खास कामगिरी करत श्रीलंकेचा दिग्गज मुथय्या मुरलीधरनच्या विक्रमाची बरोबर केली.
या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रविचंद्रन अश्विनने बॅट आणि बॉल दोन्हीने अप्रतिम कामगिरी केली होती. त्याने दुसऱ्या कसोटीत पुन्हा एकदा बॉलने आपली जादू दाखवण्यात यश मिळवले. या मालिकेतील उत्कृष्ट कामगिरीसाठी अश्विनला ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार देण्यात आला. यासह तो कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा प्लेयर ऑफ द सिरीज पुरस्कार जिंकणारा मुथय्या मुरलीधरनसह संयुक्त पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. दोघांनी पण प्रत्येकी ११ वेळा हा पुरस्कार पटकावला आहे.
अश्विनने अकराव्यांदा ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार पटकावला –
बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत रविचंद्रन अश्विनने बॅटने एकूण ११४ धावा केल्या, तर गोलंदाजीत एकूण ११ विकेट्स घेण्यात तो यशस्वी झाला. अश्विनने बांगलादेशविरुद्ध कानपूर कसोटी सामन्यात दोन्ही डावात एकूण ५ विकेट्स घेतल्या. या मालिकेतील त्याच्या अष्टपैलू कामगिरीबद्दल त्याला प्लेयर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार आला. अश्विनने ३९ कसोटी मालिका खेळल्यानंतर ११व्यांदा हा पुरस्कार पटकावला आहे, तर मुथय्या मुरलीधरनने ६९ मालिका खेळल्यानंतर ११ वेळा हा पुरस्कार जिंकण्यात यश मिळविले होते.
हेही वाचा – VIDEO : ‘विराटपेक्षा ‘या’ २४ वर्षीय खेळाडूचा रेकॉर्ड चांगला…’, पाकिस्तानच्या कसोटी कर्णधाराचे वक्तव्य
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा ‘प्लेयर ऑफ द सिरीज’चा पुरस्कार जिंकणारे खेळाडू –
मुथय्या मुरलीधरन – ११
रविचंद्रन अश्विन – ११
जॅक कॅलिस – ८
शेन वॉर्न – ८
इम्रान खान – ८
रिचर्ड हेडली – ८