IND v BAN Ashwin says India Fielding Coach T Dilip celebrity : बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर रविचंद्रन अश्विनने स्लिप क्षेत्रातील संघाच्या क्षेत्ररक्षणात झालेल्या सुधारणेचे श्रेय टी दिलीपला यांना दिले. त्याने टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी दिलीप यांनी घेतलेल्या कठोर परिश्रमाबद्दल सांगितले. अश्विन टी दिलीप यांचे कौतुक करतानाचा व्हिडीओ बीसीसीआयने शेअर केला आहे.

अश्विनने टी दिलीप यांचा किस्सा सांगितला –

राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षक असताना टी दिलीप आर श्रीधरच्या जागी भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक बनले होते. आता टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर झाल्यानंतरही संघ व्यवस्थापनाने टी दिलीप यांना क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून कायम ठेवले आहे. आता बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडीओत रविचंद्रन अश्विनने टी दिलीप यांचे नाव इंटरनेटवर सर्च केल्यानंतरचा एक मजेशीर किस्सा सांगितला आहे.

अश्विनकडून टी दिलीप यांचे कौतुक –

टी दिलीप यांनी संघाच्या क्षेत्ररक्षणात काही नवे प्रयोग केले जे बऱ्यापैकी यशस्वी ठरले. पराभवानंतर संघातील खेळाडूला ‘सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक’ पुरस्कार देण्याची परंपरा त्यांनी सुरू केली, त्यामुळे खेळाडूंचे मनोबल खूप उंचावले. सामन्याच्या पहिल्या डावात ११३ धावा केल्यानंतर दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेणाऱ्या अश्विनला पत्रकार परिषदेत क्षेत्ररक्षणाबाबत विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, “क्षेत्ररक्षणाबाबत बोलायचे असेल तर सुरुवात कुठून करायची? आधी दिलीप सरांबद्दल बोलूया. त्यांचे नाव शोधले तेव्हा इंटरनेटवर ‘सेलिब्रिटी’ येत होते.”

हेही वाचा – Irani Cup 2024 स्पर्धेसाठी संघ जाहीर! दोन मराठमोळे कर्णधार आमनेसामने, ‘या’ तारखेला रंगणार सामना

टी दिलीप सेलिब्रेटी –

रविचंद्रन अश्विन पुढे म्हणाला, “त्यांची ओळख ही (सेलिब्रिटी) अशी नाही. ते आमचा ‘सेलिब्रेटी’ फील्डिंग कोच आहेत. एक सुपरस्टार आहेत. एक-दोन वर्षांपूर्वी स्लिप क्षेत्रात झेल घेणे आमच्यासाठी आव्हानात्मक होते, पण जैस्वालने या बाबतीत खूप सुधारणा केली आहे. दिलीप यांना त्याच्यासोबत खूप मेहनत घेतली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून आतापर्यंत जैस्वालने याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे.”

हेही वाचा – Miracle Kid : ऋषभ पंतवर वसीम अक्रमचा स्तुतीसुमनांचा वर्षाव

भारताचे क्षेत्ररक्षण सुधारले –

भारताचा अष्टपैलू खेळाडू पुढे म्हणाला, “तो स्लिपमध्ये तसेच फलंदाजाच्या जवळ क्षेत्ररक्षण करण्यात उत्कृष्ट आहे. केएल राहुल हा दुसऱ्या स्लिपसाठी उत्तम पर्याय आहे, पण आता त्याची जागा जैस्वालने घेतली आहे. माझ्या मते या दोघांनी खूप मेहनत घेतली आहे.” बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात अश्विने अष्टपैलू प्रदर्शन केले, ज्यासाठी त्याला सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला. त्याने अगोदर पहिल्या डावात फलंदाजी करताना शतक झळकावले. त्यानंतर दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत बांगलादेशला २३४ धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका निभावली.