IND vs BAN 1st Test Rishabh Pant apologized to Mohammed Siraj : भारत आणि बांगलादेश संघांतील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात आहे. या सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने रविचंद्रन अश्विनच्या शतकाच्या जोरावर ३७६ धावांचा डोंगर उभारला. यानंतर टीम इंडियाला जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात विकेट मिळवून दिली. बुमराहने शदमानला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर ३.५ षटकांत बांगलादेशची धावसंख्या २ बाद ८ धावा झाली असती, परंतु ऋषभ पंतच्या चुकीमुळे भारताचे नुकसान झाले आणि सिराजला विकेट मिळाली नाही. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

वास्तविक, हे मोहम्मद सिराजचे दुसरे षटक होते आणि त्याने झाकीर हसनविरुद्ध पाचव्या चेंडूवर एलबीडब्ल्यूचे जोरदार अपील केले. संपूर्ण भारतीय संघाने अपील केले, परंतु ऑनफिल्ड अंपायरने नॉट आऊट दिले. यानंतर मोहम्मद सिराजने कर्णधार रोहित शर्माला डीआरएस घेण्यास सांगितले, पण ऋषभ पंतने रोहित शर्माला घेऊ दिला नाही.

ऋषभने रोहितला डीआरएस घेऊ दिला नाही –

यष्टिरक्षक म्हणून पंतला चेंडू जवळून पाहता आला, त्याने रोहितला सांगितले की ‘चेंडूची जास्त उंची नाही, पण तो लेग साइडच्या बाजूने निघून जाईल.’ म्हणजे चेंडूमध्ये उंचीची समस्या नाही, पण लेग स्टंपला मिस करेल. पंतच्या सांगण्यावरून कर्णधार रोहितने डीआरएस घेतला नाही. काही वेळाने, स्क्रीनवर रिप्ले दाखवला गेला, जिथे तीन सेगमेंट रेड दिसत होते, ‘विकेट-हिटिंग’, ‘इम्पॅक्ट – इनलाइन’, ‘पिचिंग-इनलाइन’ हे तिन्ही सेगमेंट दर्शवतात की, जर भारताने डीआरएस घेतला असता, तर लंच ब्रेकच्या आधी सिराजच्या खात्यात एक विकेट आली असती.

हेही वाचा – IND vs BAN : ‘रोहित-विराट’ला बाद करूनही महमूद हसन असंतुष्ट! काय आहे कारण?

मोहम्मद सिराज संतापल्याने ऋषभने मागितली माफी –

मोठ्या स्क्रीनवर जेव्हा रिप्ले दाखवला गेला, तेव्हा सिराजच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसत होता. कारण ऋषभच्या चुकीमुळे सिराजला विकेट मिळू शकली नाही. यानंतर ऋषभने आपल्या जागेवर उभे राहून चूक मान्य केली आणि त्याबद्दल त्याने सिराजची माफीही मागितल्याचे दिसून आले. झाकीर तेव्हा दोन धावा करून खेळत होता. झाकीरला मात्र पंतच्या चुकीचा फारसा फायदा उठवता आला नाही आणि तीन धावा करून तो आकाश दीपचा बळी ठरला. झाकीरशिवाय आकाश दीपनेही लंच ब्रेकच्या आधी त्याच्या दुसऱ्याच षटकात मोमिउलला बाद केले.