भारत आणि बांगलादेश संघांत बुधवारी दुसरा वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात रोहित शर्माने झंजार खेळी करताना भारताला विजयाच्या उंबरठ्वर पोहोचवले होते. परंतु त्याची ही खेळी अपयशी ठरली. ज्यामुळे भारतीय संघाला ५ धावांनी पराभव पत्कारावा लागला. सामना आणि मालिका जरी भारताने गमावली असली, तरी कर्णधार रोहित शर्माने एक मोठा विक्रम नोंदवला आहे.
बुधवारी बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५०० षटकार ठोकणारा, रोहित पहिला भारतीय ठरला आहे. त्याचबरोबर जगभरातील दुसरा फलंदाज ठरला आहे. मैदानात हाताला दुखापत झाल्यानंतर ९व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रोहितने, धावांचा पाठलाग करताना उशिरा पुनरागमन केले. त्याने २८ चेंडूत ३ चौकार आणि ५ षटकारांसह नाबाद ५१ धावांची खेळी करून भारताला विजयाच्या जवळ नेले, परंतु शेवटी त्यांना विजय मिळवण्यात अपयश आले.
जगातील दुसरा, तर भारताचा पहिलाच खेळाडू –
रोहित शर्मा सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत जगातील दुसरा फलंदाज आहे. कारण पहिल्या क्रमांकावर वेस्ट इंडिजचा दिग्गज ख्रिस गेल आहे. त्याच्या आंतरराष्ट्रीय षटकारांची संख्या ५३३ आहे. त्याचबरोबर आता रोहित शर्माचे ५०२ षटकार झाले आहेत. इतर कोणताही भारतीय फलंदाज ४०० षटकारांच्या जळवळपास नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत शाहिद आफ्रिदी (४७६), ब्रेंडन मॅक्युलम (३९८), मार्टिन गुप्टिल (३८३) हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. भारतीयांच्या बाबतीत बोलायचे तर ३५९ षटकारांसह, एमएस धोनी भारतीय खेळाडूंमध्ये रोहितच्या सर्वात जवळ आहे.
सामन्याबद्दल बोलायचे बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी ७ बाद २७१ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये मेहदी हसन मिराजने सर्वाधिख धावा केल्या होत्या. त्याने नाबाद १०० धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरात भारतीय संघ ९ बाद २६६ धावाच करु शकला. भारताकडून श्रेयस अय्यरने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ८२ धावांचे योगदान दिले.