Rohit Sharma preparation for test series against New Zealand : सध्या भारत आणि बांगलादेश यांच्यात तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. या मालिकेत टीम इंडिया सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली खेळत आहे. कारण रोहित शर्माने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकून दिल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. त्यानंतर सूर्यकुमार यादवला टीम इंडियाच्या मर्यादीत षटकाच्या संघाचा कर्णधार नियुक्त केले. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेनंतर टीम इंडिया पुन्हा रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसणार आहे. तत्पूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल –
तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी न्यूझीलंड संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेपूर्वी रोहित शर्माचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने नुकतीच बांगलादेशविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी जिंकली. ही मालिका १९ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर दरम्यान खेळली होती. आता टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळायची आहे, ज्यासाठी रोहित शर्मा तयारी करताना दिसत आहे. भारतीय कर्णधाराच्या प्रशिक्षणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
किवी संघ शुक्रवारी भारतासाठी रवाना होणार –
आता भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जाणार आहे. दोन्ही मालिकांमध्ये १० दिवसांचे अंतर होते. भारतीय कर्णधाराने बहुधा या अंतरात ब्रेक घेतला नाही आणि पुढच्या मालिकेची तयारी सुरू केली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये हिटमॅन मैदानात धावताना दिसत आहे. न्यूझीलंड मालिकेपूर्वी त्याला कोणतीही कसर सोडायची नाही. त्यामुळे तो मैदानावर खूप घाम गाळताना दिसत आहे.न्यूझीलंडने भारताविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. किवी संघ शुक्रवारी भारतासाठी रवाना होणार आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक –
या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा अद्याप झालेली नाही. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाईल. त्यानंतर कसोटी मालिकेतील दुसरा सामना २४ ते २८ ऑक्टोबर दरम्यान पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर मालिकेतील शेवटची आणि तिसरी कसोटी १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाईल.
हेही वाचा – Rohit Sharma : रोहित शर्मा २०२७ चा एकदिवसीय विश्वचषक खेळणार की नाही? बालपणीचे कोच दिनेश लाड यांनी दिले उत्तर
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंड संघ :
टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ’रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोधी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग.