IND vs BAN Sanju Samson 5 consecutive sixes video Viral : भारत आणि बांगलादेश यांच्यात तिसरा टी-२० सामना हैदराबाद येथे खेळला जात आहे. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज संजू सॅमसन या सामन्यात चांगलाच फॉर्ममध्ये दिसला. या सामन्यात त्याने अवघ्या ४० चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या दरम्यान त्याने बांगलादेशी गोलंदाजांची चागलीच धुलाई केली. यापैकी एका गोलंदाजाच्या षटकात तर संजूने सलग पाच षटकार ठोकले. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
या सामन्यात संजू सॅमसनने भारतीय डावातील १० वे षटक टाकायला आलेल्या रिशाद हुसेनची चांगलीच धुलाई केली. संजूने रिशादच्या एका षटकात सलग पाच षटकार मारले. या षटकाच्या पहिल्या चेंडूवर संजूने एकही धाव काढली नव्हती, मात्र पुढच्या पाच चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकून धावांचा पाऊस पाडला. यानंतर बांगलादेशचा कर्णधार शांतोने रिशाद हुसेनला एकही षटक टाकायला दिले नाही. या सामन्यात रिशाद हुसेनने २ षटकात ४६ धावा दिल्या.
संजू सॅमसनने भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले –
संजू सॅमसनने या सामन्यात केवळ दमदार शतकच केले नाही तर एक मोठा विक्रमही रचला आहे. संजू सॅमसनने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरे सर्वात जलद शतक झळकावले. भारतासाठी सर्वात जलद शतक झळकावण्याचा विक्रम आजही टीम इंडियाचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अवघ्या ३५ चेंडूत शतक झळकावले. संजूने या सामन्यात एकूण ४७ चेंडूत ११ धावा केल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकारही मारले. संजूच्या या खेळीमुळे भारतीय संघाने या सामन्यात २० षटकात २९७ धावा केल्या. जी टी-२० आंतरराष्ट्रीय मधील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या आहे.
हेही वाचा – IND vs BAN : भारताने उभारली टी-२० मधील सर्वात मोठी धावसंख्या, ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील दुसराच संघ
भारताने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली –
अभिषेक शर्मा पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर संजू सॅमसन आणि सूर्यकुमार यादव यांनी बांगलादेशच्या गोलंदाजीवर कहर केला. संजूने आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले, तर सूर्यानेही ७५ धावांची शानदार खेळी केली. संजू-सूर्यापाठोपाठ हार्दिक पांड्या आणि रियान पराग यांनीही शेवटच्या षटकांमध्ये फलंदाजी करताना चांगलीच फटकेबाजी केली. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाने २०षटकांत ६ गडी गमावून २९७ धावा केल्या. टीम इंडियाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. त्याचबरोबर या फॉरमॅटमध्ये भारतीय संघाची ही सर्वात मोठी धावसंख्या आहे.