IND vs BAN 1st Test Match Updates Shubman Gill 5th Century : बांगलादेशविरुद्ध चेन्नई कसोटीत टीम इंडियाचा ‘प्रिन्स’ शुबमन गिलने कारकिर्दीतील पाचवे शतक झळकावले आणि ११९ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर विजयासाठी ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले. टीम इंडियाला या धावसंख्येपर्यंत नेण्यात शुबमन गिलसह ऋषभ पंतने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने १०९ धावांची शानदार खेळी केली. शुबमन गिलने या शतकी खेळीच्या जोरावर बाबर आझमला मागे टाकत विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली.
एक वेळ अशी होती जेव्हा भारताने ६७ धावांवर तीन विकेट्स गमावल्या होत्या, तेव्हा गिल आणि पंत यांनी चौथ्या विकेटसाठी १६७ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. शुबमन गिलचे हे कसोटी क्रिकेटमधील बॅक टू बॅक शतक आहे. यापूर्वी त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील शेवटच्या कसोटीत शतक (११९) झळकावले होते. गिलने या खेळीत १० चौकार आणि ४ गगनचुंबी षटकार ठोकले. यासह त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० षटकारांचा टप्पाही पार केला.
चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर शुबमन गिलने हे शतक झळकावले. यासह त्याने विराट कोहली आणि सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. विशेष म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पण चेन्नईतच हा पराक्रम केला होता.गेल्या ५० वर्षात, पहिल्या डावात शून्यावर बाद झाल्यानंतर दुसऱ्या डावात शतक झळकावणारा गिल हा मायदेशातील भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे.
हेही वाचा – IND vs BAN : ऋषभ पंतने फलंदाजी करताना सेट केली बांगलादेशची फिल्डिंग, VIDEO पाहून आवरता येणार नाही हसू
भारतासाठी घरच्या कसोटीत पहिल्या डावात शून्य आणि दुसऱ्या डावात शतक करणारे फलंदाज (गेल्या ५० वर्षांत) –
०, १३६ – सचिन विरुद्ध पाकिस्तान, चेन्नई (१९९९)
०, १०४* – कोहली विरुद्ध श्रीलंका, कोलकाता (२०१७)
०, ११९* – इंग्लंड विरुद्ध बांगलादेश, चेन्नई (२०२४)*
शुबमनने शतक झळकावत भारताचा बाबर म्हणणाऱ्यांची बोलती केली बंद –
विशेष म्हणजे शुबमन गिल पहिल्या डावात शून्यावर बाद झाला होता, तेव्हा सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. त्याला आठव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर हसन महमूदने गिलला लिटन दासकरवी झेलबाद केले होते. गिल कसोटीत शून्यावर बाद होण्याची ही पाचवी वेळ होत. ज्यामुळे चाहते या २५ वर्षीय फलंदाजाच्या खराब कामगिरीवर संतापले होते. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी त्याला भारताचा बाबर आझम असेही म्हटले होते. पण आता शुबमन गिलने शतक झळकावून या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.