रविवारी मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा एक गडी राखून पराभव झाल्यानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर खूप भडकले आहेत. बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाने भारतीय संघाच्या तोंडून विजय हिसकावून घेतला आणि सुनील गावसकर यांनी याप्रकरणी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला क्लास घेत वरिष्ठ खेळाडूंना फैलावर घेतले आहे.
भारतीय क्रिकेट संघाने पुढील वर्षी आपल्या भूमीवर होणाऱ्या विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारताचा पराभव झाला. मात्र, तेथे पावसाने दोन सामने विस्कळीत केले होते. कर्णधार रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहली बांगलादेश दौऱ्यावर परतले, मात्र पहिल्या सामन्यात ते राहुल वगळता अपयशी ठरले. हे सर्व फलंदाज मीरपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग आहेत. दोन्ही देशांमधील एकदिवसीय मालिका सुरू असताना माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघातील मुख्य खेळाडूंना स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे.
गावसकर यांच्या मते, “भारतीय खेळाडूंनी अनेकदा कुठल्या ना कुठल्या कारणास्तव मालिका आणि सामन्यातून विश्रांती (ब्रेक) घेतली जात आहे. त्यांनी २०२३ विश्वचषकाचे एकच आता लक्ष ठेवत त्यादृष्टीने अधिकाधिक सरावाला प्राधान्य देणे गरजेचे आहे. इतर कुठल्याही विषयापेक्षा विश्वचषक यावरच त्यांनी लक्ष केंदित करून स्पर्धेसाठी मजबूत संघ कसा तयार होईल आणि तो एकसंध कसा राहील याला महत्व देणे आवश्यक आहे. संघ व्यवस्थापनाने खेळाडूंना जास्त ब्रेक देऊ नये, असा सल्ला त्यांनी दिला. विश्वचषक जिंकण्यासाठी संघाला उरलेल्या वेळेत चांगले काम करण्याची गरज आहे,” असे त्याचे मत आहे.
सुनील गावसकर पुढे म्हणतात, “ मला आशा आहे की संघातील खेळाडूंमध्ये फारसे बदल होणार नाहीत कारण संघ जास्त तोडणे आणि त्यात सतत बदल करत राहणे हे खेळाडूंच्या मानसिकतेवर खूप परिणाम करते. खेळाडूंनीही आता कोणत्या गोष्टीला अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे याकडे जागरूक होऊन उघड्या डोळ्यांनी पाहणे महत्वाचे आहे. संघ बांधणी जर व्यवस्थित झाली की मग जेव्हा तुम्ही विश्वचषकात याल तेव्हा कॉम्बिनेशन योग्य असेल तर बदल करण्याची फारशी वेळ येत नाही. सतत बदल केल्यास संघ संयोजनात बराच वेळ लागतो. विश्वचषकात असे कोणतेही सामने नाहीत जिथे तुम्हाला पराभव परवडेल. त्यामुळे मुख्य सर्व सामने वरिष्ठ खेळाडूंनी खेळणे हे फार महत्वाचे आहे.”
“जेव्हा तुम्हाला अतिरिक्त गोलंदाज किंवा फलंदाजाची आवश्यकता असेल तेव्हा कुठेतरी संघात तेवढा बदल करण्याची मुभा असते. पण मुख्य खेळाडूंना प्रत्येक एकदिवसीय सामना खेळावा लागतो. तिथे विश्रांती नाही. तू भारतासाठी खेळत आहेस. विश्रांती नाही. तुला विश्वचषक जिंकायचा आहे. त्यासाठी, प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला ते संयोजन आवश्यक आहे, ” असे ७३ वर्षीय गावसकर म्हणाले.