Sunil Gavaskar Foot Licking statement on Gautam Gambhir : कानपूर कसोटीच्या विजयाचे श्रेय मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना दिले जात असल्याने महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर संतापले आहेत. कानपूरमध्ये बांगलादेशवर भारताच्या नेत्रदीपक विजयाचे श्रेय गौतम गंभीरऐवजी रोहित शर्माला द्यायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे. रोहितच्या कर्णधारपदाखाली भारताने गेल्या काही वर्षांत क्रिकेटची आक्रमक शैली स्वीकारली असून त्याचे श्रेय त्याला मिळाले पाहिजे, यावर गावसकर यांनी भर दिला. त्याचबरोबर या विजयाचे श्रेय काही लोक गौतम गंभीरला देत असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्याच्या म्हणण्यानुसार, असे करणारे लोक फक्त त्याचे तळवे चाटत आहेत.

सुनील गावसकर काय म्हणाले?

भारत-बांगलादेश यांच्यातील कानपूर कसोटी सामन्यातील पहिल्या तीन दिवसाचा खेळ पावसामुळे वाया गेला होता. यानंतर भारताने पहिल्या डावात चमकदार कामगिरी केली आणि कसोटी फॉरमॅटमध्ये ५०, १००, १५०, २०० आणि २५० च्या जलद धावसंख्येचे नवे विक्रम केले. यानंतर भारताने २८५/९ धावसंख्येवर डाव घोषित केला. त्यानंतर दुसऱ्या डावातही बांगलादेशला लवकर पॅव्हेलियनमध्ये पाठवून १७.२ षटकांत ९५ धावांचा पाठलाग करत दणदणीत विजय मिळवला आणि मालिका २-० अशी जिंकली. या विजयानंतर सर्वजण गौतम गंभीरच्या कोचिंगला आणि त्याच्या विचारसरणीला सलाम करत होते. पण सुनील गावसकरांनी आपले वेगळे मत मांडले आहे.

विजयाचे श्रेय गंभीरला देणे म्हणजे त्याचे तळवे चाटण्यासारखे –

सुनील गावसकर यांनी स्पोर्ट्स स्टारसाठी लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले की, ‘टीम इंडियाच्या आक्रमक फलंदाजी शैलीचे श्रेय रोहित शर्माला द्यायला हवे. याचे श्रेय गौतम गंभीरला देणे म्हणजे त्याला लोणी लावण्यासारखे आहे. कारण गंभीरने प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारून केवळ दोन महिने झाले आहेत. त्याने स्वत: कधीही मॅक्युलमच्या शैलीत आक्रमक फलंदाजी केली नाही. त्यामुळे याचे श्रेय त्याला देणारे लोक फक्त त्याचे तळवे चाटत आहेत. रोहित शर्मा नक्कीच अशी फलंदाजी करतो. तो स्वत:साठी नाही तर संघासाठी फलंदाजी करतो. कानपूर कसोटीच्या पहिल्या डावात रोहितनेच बांगलादेशवर आक्रमण केले आणि त्यानंतर सर्व भारतीय फलंदाजांनी त्याच पद्धतीने फलंदाजी केली.’

हेही वाचा – Juned Khan : रिक्षाचालक ते चॅम्पियन मुंबईचा वेगवान गोलंदाज असा संघर्षमय प्रवास असणारा, कोण आहे जुनेद खान?

गंभीरने मॅक्कुलमसारखी फलंदाजी क्वचितच केली –

सुनील गावसकर पुढे म्हणाले, ‘बेन स्टोक्स आणि ब्रेंडन मॅक्युलम यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडची फलंदाजी पूर्णपणे बदलली, पण गंभीरने मॅक्कुलमसारखी फलंदाजी क्वचितच केली. टीम इंडियाच्या विजयाचे श्रेय जर कोणाला जात असेल तर ते फक्त रोहितलाच जाते बाकी कोणालाच नाही.’ गावसकर यांनी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सुरू करण्याचे श्रेय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दिले आणि सांगितले की जर डब्ल्यूटीसी गुण नसते, तर कोणत्याही संघाने सामना ड्रॉ करण्याचा विचार केला असता.’