India Made World Record With Highest T20 Score: बांगलादेशविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय फलंदाजांनी अशी कामगिरी केली, जी येणारी अनेक वर्षे लक्षात राहिल. भारताकडून संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या यांनी विस्फोटक खेळी खेळली. या खेळाडूंमुळेच टीम इंडियाने २९७ धावांची डोंगराएवढी विक्रमी धावसंख्या उभारली. टीम इंडियाच्या खेळाडूंनी मैदानात उतरताच धावांचा पाऊस पाडला. यानंतर बांगलादेशचे फलंदाज चांगलेच फ्लॉप झाले आणि संघाला २० षटकांत केवळ १६४ धावा करता आल्या आणि भारतीय संघाने १३३ धावांनी विजय मिळवला. यासह भारताने नवा विक्रम आपल्या नावे केला आहे.
हा पराक्रम करणारा भारत पहिला संघ
भारताच्या फलंदाजांनी बांगलादेशविरूद्ध टी-२० सामन्यात चकित करणारी फलंदाजी केली. फलंदाजीनंतर गोलंदाजीतही भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. यासह संघाच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाने विजय मिळवताच मालिकेत ३-० असा निर्भेळ विजय मिळवला. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात टीम इंडिया सर्वाधिक वेळा २०० हून अधिक धावा करणारा संघ बनला आहे. संघाने ३७ वेळा टी-२० क्रिकेटमध्ये २०० हून अधिक धावा केल्या आहेत. सॉमरसेट संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्यांनी T20 क्रिकेटमध्ये ३६ वेळा, चेन्नई सुपर किंग्ज संघ ३५ वेळा आणि RCB संघाने ३३ वेळा २०० पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. टीम इंडियाने आता या सर्व संघांना मागे टाकून पहिले स्थान पटकावले आहे.
पुरुषांच्या T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा २०० पेक्षा जास्त धावसंख्या करणारे संघ
३७ – भारत
३६ – सॉमरसेट
३५ – चेन्नई सुपर किंग्ज
३३ – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू
३१ – यॉर्कशायर
२०२४ मध्ये भारतीय संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. या संघाने २०२४ च्या टी-२० विश्वचषकात एकही सामना न गमावता विजेतेपद पटकावले. यानंतर श्रीलंका आणि बांगलादेशचा मालिकेत पराभव केला आहे. भारताने २०२४ या वर्षात टी-२० क्रिकेटमध्ये ६ वेळा २०० अधिक धावा केल्या आहेत. तर जपानने २०२४ मध्ये टी-२० मध्ये ७ वेळा २०० हून अधिक धावा केल्या होत्या.
T20I मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक वेळेस २०० पेक्षा जास्त धावसंख्या करणारे संघ:
७ – २०२३ मध्ये भारत
७ – २०२४ मध्ये जपान
६- २०२२ मध्ये इंग्लंड
६ – २०२२ मध्ये दक्षिण आफ्रिका
६ – २०२४ मध्ये भारत
बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारताकडून संजू सॅमसनने त्याचे टी-२० क्रिकेटमधील पहिले झंझावाती शतक झळकावले आणि टीम इंडियाला मोठी धावसंख्या बनवण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. त्याने ४७ चेंडूत १११ धावा केल्या. याशिवाय सूर्यकुमार यादवने ३५ चेंडूत ७५ धावा केल्या. तर नंतर आलेल्या हार्दिक पंड्याने ४७ धावांचे योगदान दिले.