आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये आपला पहिला-वहिला दिवस-रात्र कसोटी सामना खेळणाऱ्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. बांगलादेशवर एक डाव आणि ४६ धावांनी मात करत भारताने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत निर्भेळ यश संपादन केलं. या विजयासह भारतीय संघाने कसोटी क्रिकेटध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली आहे.
भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सलग ४ कसोटी सामने डावाने जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. याचसोबत विराट कोहलीही अशी कामगिरी करणारा पहिला कर्णधार ठरला आहे. बांगलादेशचा पहिला डाव १०६ धावांत संपल्यानंतर भारताने पहिल्या डावात विराट कोहलीचं शतक आणि पुजारा-रहाणेच्या अर्धशतकी खेळाच्या जोरावर ९ गड्यांच्या मोबदल्यात ३४७ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरादाखल बांगलादेशचा दुसरा डाव १९५ धावांत संपला.
अवश्य वाचा – टीम इंडियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार, मालिकेतही मारली बाजी
भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात धडाकेबाज कामगिरी केली. उमेश यादवने दुसऱ्या डावात बांगलादेशचा निम्मा संघ गारद केला. त्याला इशांत शर्मानेही ४ बळी घेत चांगली साथ दिली. बांगलादेशकडून दुसऱ्या डावात मुश्फिकुर रहिमने अर्धशतकी खेळी करत एकाकी झुंज दिली.