बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटचा संघात समावेश करण्यात आला होता. पण व्हिसाच्या समस्येमुळे त्याला बांगलादेशमध्ये पोहोचण्यास थोडा विलंब झाला. त्यामुळे पहिल्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तो खेळू शकला नसला, तरी तो गुरुवारी पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या पथकात सामील झाला आहे.
टीम इंडियाचा संघ आधीच जाहीर करण्यात आला होता, मात्र खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्या वाढल्या असून त्यामुळे संघात हा बदल करावा लागला आहे. जयदेव नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत खेळत होता, त्याच्या संघाने (सौराष्ट्र क्रिकेट संघ) विजेतेपद पटकावले होते. दरम्यान पहिला कसोटीचा पहिला दिवस बुधवारी पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ९० षचकांत ६ बाद २७८ धावा केल्या आहेत.
बुधवारी भारतीय संघाचा कर्णधार केएल राहुलने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. भारतीय सलामी फलंदाज शुबमन गिल (२०) आणि केएल राहुल (२२) बाद झाले. त्यानंतर चेतेश्वर पुजारने शानदार खेळी साकारताना भारतीय संघाचा डाव सावरला. परंतु अवघ्या १० धावांनी त्याचे शतक हुकले. त्याने २०३ चेंडूत ११ चौकारांच्या मदतीने ९० धावा केल्या. त्याचबरोबर ऋषभ पंतने ४६ धावांचे योगदान दिले.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला, तेव्हा श्रेयस अय्यर १८९ चेंडूत ८२ धावांवर नाबाद आहे. त्याने या खेळीत १० चौकार लगावले. त्याच्यासोबत आश्विन ३ धावांवर नाबाद आहे. बांगलादेश संघाकडून तैजुल इस्लामने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मेहदी हसनने २ आणि खालीद अहमदने १ विकेट घेतली.