India vs Bangladesh, World Cup 2023: टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने बांगलादेश विरुद्धच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाला “गाफील राहू नका”, असा सल्ला दिला आहे. विराट म्हणाला की, “वर्ल्ड कपमध्ये कोणताही संघ मजबूत किंवा कमकुवत नसतो. अशा मोठ्या स्पर्धेमध्ये असे धक्कादायक पराभव होतात.” कोहलीचे हे वक्तव्य या विश्वचषकातील दोन मोठ्या पराभवानंतर आले आहे. रविवारी प्रथम अफगाणिस्तानने दिल्लीत इंग्लंडचा ६९ धावांनी पराभव केला आणि त्यानंतर मंगळवारी धरमशाला येथे पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेचा ३८ धावांनी पराभव करून आपल्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा विजय नोंदवला.
बांगलादेशविरुद्ध भारताच्या विश्वचषक सामन्यापूर्वी कोहलीने स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सांगितले की, “विश्वचषकात कोणताही मोठा संघ नाही. जेव्हा तुम्ही फक्त मोठ्या संघांवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात करता तेव्हा अशा पराभवांनी खूप निराश होतात. २००७ साली वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत शेजाऱ्यांकडून पराभूत झाल्यापासून पुढील विश्वचषकात भारताने बांगलादेशवर वर्चस्व राखले आहे. विश्वचषकात आशियातील भारताचे शेजारी बांगलादेशकडून पराभूत झाले नाही. परंतु कोहलीने कर्णधार शाकिब अल हसनबरोबर गुरुवारच्या सामन्याआधी त्याला पाचवेळा बाद केल्याची आठवण करून दिली.
कोहली म्हणाला, शाकिबबाबत भारताला काळजी घ्यावी लागेल
विराट कोहली म्हणाला, “गेल्या काही वर्षांत मी त्याच्या (शाकिब) विरुद्ध खूप खेळलो आहे. त्याच्याकडे चेंडूवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता आहे. तो खूप अनुभवी गोलंदाज आहे. तो नवीन चेंडूने चांगली गोलंदाजी करतो, फलंदाजाला कसे चकवायचे हे त्याला माहिती असून तो खूप कमी धावा देतो.”
कोहली पुढे म्हणाला, “तुम्हाला या सर्व गोलंदाजांविरुद्ध तुमचा सर्वोत्तम खेळ करणे आवश्यक आहे. जर तुम्ही ते करू शकत नसाल, तर हे गोलंदाज तुमच्यावर दबाव आणू शकतात आणि तुम्हाला बाद करण्याची क्षमता त्यांच्यात आहे. बांगलादेशला हलक्यात घेऊ नका.” भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याही कोहलीच्या मताशी सहमत होता. पांड्या म्हणाला, “नझमुल आणि शाकिब हे दोन्ही अतिशय स्मार्ट क्रिकेटर आहेत. तो बांगलादेश क्रिकेटचे ओझे बर्याच काळापासून आपल्या खांद्यावर घेत आहे.”
दुसरीकडे, कोहली हा आधुनिक युगातील सर्वोत्तम फलंदाज असल्याचे शाकिबचे मत आहे. तो म्हणाला, “तो (कोहली) एक सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे, कदाचित आधुनिक काळातील दिग्गज फलंदाज त्याला म्हणता येईल. मला वाटते की मी त्याला पाच वेळा बाद केले असून हे माझे भाग्य आहे. त्याची विकेट घेतल्याने मला नक्कीच आनंद होईल.”