India vs Bangladesh, World Cup 2023: वर्ल्ड कप २०२३चा १७वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यादरम्यान बांगलादेशच्या डावाच्या नवव्या षटकात हार्दिकच्या पायाला दुखापत झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. फिजिओ त्याच्या डाव्या बाजूला पट्टी लावताना दिसले, पण तो षटक पूर्ण टाकू शकला नाही. त्याने आधीच तीन चेंडू टाकले होते. उर्वरित तीन चेंडू विराट कोहलीने टाकले. २०१७ नंतरचा हा पहिला एकदिवसीय सामना होता ज्यात कोहलीने गोलंदाजी केली.
विराटने शेवटच्यावेळी गोलंदाजी ऑगस्ट २०१७ मध्ये कोलंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध वन डेमध्ये गोलंदाजी केली होती. याशिवाय त्याने एकदिवसीय विश्वचषकात चार वेळा गोलंदाजी केली आहे. त्याने आठ वर्षांनंतर विश्वचषकात गोलंदाजी केली. विराटने २०११ विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि अंतिम फेरीत श्रीलंकेविरुद्ध गोलंदाजी केली होती. याशिवाय २०१५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये त्याने गोलंदाजी केली होती.
हार्दिकच्या नवव्या षटकातील पहिल्या तीन चेंडूंवर बांगलादेशी फलंदाजाने दोन चौकार मारले होते. यानंतर कोहलीने उर्वरित तीन चेंडू टाकले. चौथ्या चेंडूवर त्याने एकही धाव दिली नाही. पाचव्या आणि सहाव्या चेंडूवर प्रत्येकी एक धाव आली. विराट कोहली चष्मा लावून गोलंदाजी करताना दिसला. ज्यावेळी विराट कोहली गोलंदाजी करायला आला तेव्हा स्टेडियममध्ये चाहत्यांनी एकच जल्लोष केला. त्याच्या गोलंदाजीचा व्हिडीओ आयसीसीने शेअर केला आहे. बीसीसीआयनेही फोटो शेअर केले आहेत.
विराट कोहलीने यापूर्वीही गोलंदाजी केली आहे. कोहलीच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४ विकेट्स, टी२० मध्ये ४ विकेट्स आणि आयपीएलमध्येही ४ विकेट्स घेतल्या आहेत. पण आज विराटने ६ वर्षांनंतर गोलंदाजी केली आहे. कोहलीच्या गोलंदाजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, हार्दिक पांड्याची दुखापत ही भारतासाठी वाईट बातमी आहे. दुखापत झाल्यानंतर पांड्याने पुन्हा गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा पाय मुरगळला असल्याने तो गोलंदाजी करू शकला नाही. त्यानंतर त्याला मैदान सोडावे लागले. आता चिंतेची बाब अशी आहे की, हार्दिकची दुखापत आणखी गंभीर गेल्यास त्याला पुढील सामन्यातूनही बाहेर राहावे लागू शकते. सध्या त्याला हॉस्पिटलमध्ये दुखापतीचे निदान करण्यासाठी नेण्यात आले आहे.
दोन्ही संघातील ११ खेळत आहे
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एल. राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेश: लिटन दास, तनजीद तमीम, मेहदी हसन मिराज, नझमुल हसन शांतो (कर्णधार), मुशफिकुर रहीम (यष्टीरक्षक), नसुम अहमद, तौहीद हृदोय, महमुदुल्लाह, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम.