IND vs BAN Virat Kohli Gesture Towards R Ashwin Video Viral : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी भारताने २८० धावांनी जिंकली. या साामन्यात भारताने बांगलादेशसमोर ५१५ धावांचे लक्ष्य ठेवले होते, प्रत्युत्तरात संघ २३४ धावांत गारद झाला. भारताच्या या विजयात स्टार अष्टपैलू रविचंद्रन अश्विनने महत्त्वाची भूमिका बजावली, ज्याने बॉलसह बॅटनेही महत्त्वाचे योगदान दिले. त्याने पहिल्या डावात दमदार शतक झळकावले तर दुसऱ्या डावात सहा विकेट्स घेत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. यानंतर विराट कोहलीने अश्विनचे आपल्या खास शैलीत अभिनंदन केले, ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

बांगलादेशच्या दुसऱ्या डावात मेहदी हसन मिराझला बाद करत अश्विनने पाच विकेट्सचा टप्पा पूर्ण केला. पाच विकेट्स पूर्ण केल्यानंतर अश्विन संघासोबत आनंद साजरा करत होता. त्यावेळी विराट कोहली पुढे आला आणि त्याने अश्विनला खास वाकून मानवंदना देत अभिनंदन केले. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. विराटबद्दल बोलायचे झाले तर बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत हा खेळाडू काही विशेष करू शकला नाही.

चेन्नई कसोटीत विराटची बॅट तळपली नाही –

प्रदीर्घ कालावधीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा विराट चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात स्वस्तात बाद झाला. येथे हसन महमूदने त्याला लिटन दासकरवी झेलबाद केले आणि त्याचा डाव अवघ्या सहा धावांवर संपुष्टात आला. विराटचा हा खराब फॉर्म दुसऱ्या डावातही कायम राहिला आणि तो १७ धावा करून मेहदी हसन मिराजचा बळी ठरला. विराटला बांगलादेशी गोलंदाजाने एलबीडब्ल्यू आऊट केले. मात्र, दुसऱ्या कसोटीत त्याच्याकडून चांहत्यांना चांगल्या कामगिरीची अपेक्षा नक्कीच असेल.

हेही वाचा – IND vs BAN : ‘रोहित भाईने अगोदरच सांगून ठेवले होते की तुम्हाला…’, ऋषभ पंतने कर्णधाराच्या ‘त्या’ मेसेजबद्दल केला खुलासा

रविचंद्रन अश्विन ठरला सामनावीर –

सामन्यातील दमदार अष्टपैलू कामगिरीसाठी अश्विनला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात त्याने ११३ धावा केल्या होत्या. अश्विन अशा वेळी फलंदाजीला आला, जेव्हा संघाने १४४ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. इथून त्याने रवींद्र जडेजासोबत सातव्या विकेटसाठी मोठी भागीदारी साकारली. अश्विनने फलंदाजीबरोबरच चेंडूनेही चांगली कामगिरी करत दुसऱ्या डावात ६ विकेट्स घेत बांगलादेशचा डाव २३४ धावांत रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.