IND vs BAN Wasim Akram says Rishabh Pant is a miracle kid : ऋषभ पंतने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत शानदार पुनरागमन करत शतक झळकावले. त्याने कार अपघातानंतर भारतीय कसोटी संघात जवळपास ६०० दिवसांनंतर पुनरागमन केले. आता त्याच्या शतकी खेळीने सर्वांची मनं जिंकली आहेत. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वसीम अक्रमने ऋषभ पंतची पुनरागमनंतर केलेल्या खेळीचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी आस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला ऋषभ पंतला शांत ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत.

ऋषभ पंतने अपघातानंतर पुनरागमन करताना पहिल्यांदा आयपीएल २०२३ मध्ये छाप पाडली, ज्यामुळे त्याला टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले. यानंतर, पंतने अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात ६३२ दिवसांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. पंतने बांगलादेशविरुद्ध दमदार कामगिरी करत शतक झळकावले. त्याने १२८ चेंडूचा सामना करताना १०९ धावांची खेळी साकारली. ज्यामध्ये १३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश होता. कार अपघातात ऋषभ पंत जखमी झाल्यानंतर पाकिस्तानातील लोक त्यांच्या प्रकृतीबाबत चिंतेत होते, असे वसीम अक्रम यांनी सांगितले.

ऋषभच्या अपघातानंतर पाकिस्तानातील लोक चिंतेत होते – वसीम अक्रम

आता पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज पंतच्या दमदार पुनरागमनाने खूप प्रभावित झाला आहे. तो म्हणाला, “ऋषभ पंतची कामगिरी बघा, त्या अपघातानंतर त्याने ज्या पद्धतीने पुनरागमन केले आणि ज्याप्रकारे कामगिरी केली ती ‘सुपरह्यूमन’सारखी आहे. तो ज्याप्रकारे अपघातात जखमी झाला होता, त्याबद्दल आम्हा सर्व पाकिस्तानी लोकांना खूप चिंता वाटली होती. मी खूप चिंतेत होतो आणि अनेक वेळा ट्विटही केले होते. पण त्याने पुनरागमन करत पहिल्यांदा आयपीएलमध्ये १५५ च्या स्ट्राइक रेटने आणि ४० च्या सरासरीने ४४६ धावा केल्या. तो एक ‘चमत्कारिक मुलगा’ आहे.”

हेही वाचा – Irani Cup 2024 स्पर्धेसाठी संघ जाहीर! दोन मराठमोळे कर्णधार आमनेसामने, ‘या’ तारखेला रंगणार सामना

ऋषभ पंतच्या मानसिक मजबूतीने प्रभावित –

वसीम अक्रमने पंतच्या मानसिक मजबूतीचेही कौतुक केले, ज्यामुळे त्याचे पुनरागमन सोपे होऊ शकले. पंत कसा कसोटी खेळत आहे यावरून अक्रमही प्रभावित झाला आहे आणि त्याने जेम्स अँडरसन आणि पॅट कमिन्स सारख्या गोलंदाजांवर प्रभाव पाडला आहे. तो म्हणाला, “त्या अपघातातून तो ज्या प्रकारे सावरला आणि ज्या प्रकारे पुनरागमन केले, त्यावरून त्याचे मानसिक आरोग्य किती मजबूत आहे हे दिसून येते. ज्या पद्धतीने तो ऑस्ट्रेलियात कसोटी खेळतो आणि कामगिरी करतो, त्याने एक वेगळीच छाप सोडली आहे. त्याने इंग्लंडमध्ये अँडरसन आणि कमिन्सविरुद्ध रिव्हर्स स्वीप मारुन सर्वांचे लक्ष वेधले होते.” तसेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी ऋषभ पंतविरुद्ध ऑस्ट्रेलियाने रणनिती आखायला सुरुवात केली आहे.