IND vs BAN 1st Test Shakib Al Hasan why does chew black thread : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला जात आहे. चेन्नईत खेळल्या जात असलेल्या या सामन्यात भारताने बांगलादेशला ५१५ धावांचे लक्ष्य दिले आहे. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगालेदशने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ४ बाद १५८ धावा केल्या होत्या. यावेळी शकीब अल हसन आणि शांतो नाबाद परतले. दरम्यान शकीब फलंदाजी करताना काळा धागा चघळताना दिसला. तो असं का करतो? याबद्दल भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकने खुलासा केला आहे.

बांगलादेशचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी करताना काळा धागा चघळताना दिसला होता. चेन्नई कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ४ विकेट्स गमावल्यांतर झाल्यानंतर शकीब फलंदाजीसाठी क्रीझवर आला होता. या स्टार अष्टपैलू खेळाडूने चौकार मारून डावाची सुरुवात केली. फलंदाजी करताना शकीबला हेल्मेटला टांगलेला काळा धागा चघळताना पाहून समालोचक तसेच चाहतेही आश्चर्यचकित झाले.

दिनेश कार्तिकने केला शकीबबद्दल खुलासा –

शकीब भारतीय गोलंदाजांसमोर अशा विचित्र गोष्टी का करत आहे, याचे लोकांना आश्चर्य वाटले. काही वेळाने त्याचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. आता भारतीय संघाचा माजी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने शाकिब अल हसनला काळे धागा चघळण्यामागचे कारण सांगितले आहे. कार्तिकने सांगितले की, बांगलादेशचा माजी कर्णधार तमीम इक्बालकडून त्याला यामागचे कारण कळले.

हेही वाचा – IND vs BAN : अश्विन अण्णाची फलंदाजीनंतर गोलंदाजीतही कमाल, अनिल कुंबळेचा विक्रम मोडत ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय

शकीब फलंदाजी करताना काळा धागा का चघळतो?

दिनेश कार्तिक म्हणाला तमिमने सांगितले की, या धागा चघळण्यामुळे शकीबला फलंदाजी करताना मदत मिळते. बांगलादेशच्या माजी सलामीवीराने सांगितले की, जेव्हा शाकिब तोंडात धागा चघळतो तेव्हा त्याचे डोके लेग साइडकडे झुकण्यापासून थांबते. त्यामुळे त्याची एकाग्रता कायम राहते आणि लक्ष विचलित होत नाही. त्याचबरोबर शकीबचे डोके सरळ राहते आणि त्याला स्वतःवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते.

हेही वाचा – Chess Olympiad 2024: चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष संघाची ऐतिहासिक कामगिरी, डी. गुकेश, अर्जुन यांच्या बळावर पहिले सुवर्णपदक केले निश्चित

शकीब कॅनडा टी-२० मध्ये पण जर्सी चघळताना दिसला होता –

यापूर्वी शकीब अल हसनला डोळ्यांशी संबंधित काही समस्या होत्या. यासाठी त्यांनी लंडनमधील एका डॉक्टरचीही भेट घेतली. तमिमने असेही सांगितले की, शकीब ग्लोबल टी-२० कॅनडा लीगमध्ये त्याची जर्सी चघळताना दिसला होता. चेन्नई कसोटीच्या पहिल्या डावात शकिबने ६४ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या आणि बांगलादेशचा पहिला डाव १४९ धावांत आटोपला. भारताने पहिल्या डावात ३७६ धावा केल्या होत्या. यानंतर ४ बाद ३८७ धावा करून दुसरा डाव घोषित केला. बांगलादेशला ५१५ धावांचे मोठे लक्ष्य मिळाले आहे.