भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पुढील सामना २२ डिसेंबरपासून मीरपूर येथे खेळल्या जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. खरं तर संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा बोटाला झालेल्या दुखापतीमुळे दुसऱ्या कसोटी सामन्यातूनही बाहेर पडला आहे. जर रोहित दुसऱ्या सामन्यात परतला जरी असता तरी भारतीय संघ व्यवस्थापनाला प्लेइंग इलेव्हन निवडण्यात खूप संघर्ष करावा लागला असता. भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा यालाही प्रश्न विचारण्यात आला की, रोहित जेव्हा परतेल तेव्हा संघाबाहेर कोण असेल, तर त्याने यावर अतिशय धक्कादायक उत्तर दिले.
रोहित शर्मा कसोटी मालिकेतून बाहेर
क्रिकबझच्या वृत्तानुसार, बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा उपलब्ध होणार नाही. रोहित संघात सामील होईल अशी अपेक्षा होती पण आता तो दुखापतीतून पूर्णपणे सावरला नसल्याची बातमी समोर येत आहे. भारताच्या आगामी मालिकेतील महत्त्वाचे सामने पाहता बीसीसीआय आणि निवड समितीला कोणताही धोका पत्करायचा नाही. वृत्तानुसार, रोहित शर्मा फलंदाजी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे परंतु वैद्यकीय संघ क्षेत्ररक्षणाबाबत थोडा चिंतेत आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आता जानेवारीत श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे आणि टी२० मालिकेत टीम इंडियात पुनरागमन करताना दिसणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील आगामी मालिका ३ जानेवारीपासून सुरू होणार आहे.
काय म्हणाला अजय जडेजा रोहित शर्माबाबत
सोनी स्पोर्ट्सशी संवाद साधताना जडेजा म्हणाला, “रोहितला घरात बसायला सांगा. जेव्हा एखाद्या खेळाडूच्या हाताला फ्रॅक्चर होते आणि तुम्ही १० दिवस बॅट धरू शकत नाही, तुम्ही जरी बरे झाले तरीही दुसऱ्या दिवशी तुम्ही संघात सामील होऊ शकत नाही. तुम्हाला आणखी १-१५ दिवस मूळ स्वरुपात यायला लागतील. आम्हाला त्याच्या दुखापतीचे स्वरूप देखील माहित नाही आणि म्हणूनच मी हा सल्ला देत आहे.”
खरे तर रोहित शर्मा संघात आला असता तर चट्टोग्राम कसोटीत शतक झळकावणाऱ्या शुबमन गिलला वगळावे लागले असते. अशा स्थितीत युवा खेळाडूसाठी ते योग्य ठरले नसते. याबाबत बाजू मांडताना टीम इंडियाचा माजी क्रिकेटर अजय जडेजा याने सोनी स्पोर्ट्सवर बोलताना अनोखे वक्तव्य केले. रोहित आल्यावर बाहेर कोणाला बसावे लागेल असा प्रश्न त्याला विचारला असता तो म्हणाला, “रोहितला म्हणावं तू आता काही दिवस घरी बसं.” केएल राहुलच्या कामगिरीवर आता काही काळ प्रश्नचिन्ह आहे पण तो उपकर्णधार आहे त्यामुळे त्याला वगळले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत गिलच्या या संघातील स्थानाबाबत निर्णय होण्याची शक्यता जास्त होती.