IND vs BAN 1st Test Basit Ali Slams PCB After India beat Bangladesh : भारताने रविवारी बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात २८० धावांनी दणदणीत विजय नोंदवला. चेन्नईच्या मैदानावर भारताने ५१५ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले होते. या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या बांगलादेशला रोहित ब्रिगेडने सामन्याच्या चौथ्या दिवशी २३४ धावांत गुंडाळले. चौथ्या डावात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने ६ आणि रवींद्र जडेजाने तीन विकेट्स घेतले. भारताच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू बासित अलीने पीसीबीवर टीका केली आहे. तो रागाने म्हणाला की आमच्या इथे अज्ञानी लोक आहेत. ज्यांना खेळपट्टीचे महत्त्व माहित नाही.

भारतात पाकिस्तानसारखी व्यवस्था नाही – बासित अली

आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना बासित अली म्हणाला, “जसप्रीत बुमराहने संपूर्ण सामन्यात पाच विकेट्स घेतल्या. अश्विनने सहा, जडेजाने पाच तर मोहम्मद सिराज आणि आकाश दीपने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. अशा प्रकारे भारतीय गोलंदाजांनी एकूण २० विकेट्स घेतल्या. कारण त्यांच्या गोलंदाजांनी आपापले काम चोखपणे पार पाडले. चौथ्या डावात चेंडू वळणार हे टीम इंडियाला माहित होते. म्हणून त्यांनी फक्त दोन फिरकीपटू उतरवले. याचे श्रेय पिच क्युरेटरला जाते. अशी खेळपट्टी कशी बनवायची ज्यावर कसोटी खेळली जाते आणि विजयी होता येते, हे त्यांना माहीत आहे. त्यांची व्यवस्था आपल्यासारखी नाही.

“आपल्या देशात खेळपट्टीला महत्त्व नसते” –

बासित अली पुढे म्हणाला, “आपल्या देशात खेळपट्टीला महत्त्व नसते, असे म्हटले जाते. कारण ते अज्ञानी लोक आहेत. हे सामान उचलून क्रिकेट खेळणारे लोक आता क्रिकेट बोर्ड चालवत आहेत. त्यामुळे मला राग येतो. या मुलांना ते काय बोध देत आहेत? खेळपट्टी समजून घेतल्यावरच पन्नास टक्के प्रश्न सुटतो. सुनील गावसकर आणि जावेद मियांदाद यांना खेळपट्टी समजून घेण्याचे महत्त्व विचारा. जर तुम्ही खेळपट्टी समजून घेतली तर तुमच्यासाठी गोष्टी सोप्या होतात. पण इथल्या लोकांना यावर विश्वास नाही.”

हेही वाचा – Ajinkya Rahane : महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! जागतिक दर्जाची अकादमी उभारण्यासाठी अजिंक्य रहाणेला दिली जमीन

भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये खूप फरक – बासित अली

बांगलादेश संघाने अलीकडेच पाकिस्तानविरुद्ध ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. बांगलादेशने पाकिस्तानला त्यांच्याच भूमीवर २-० ने पराभूत केले. त्याच वेळी, भारतातील बांगलादेशची स्थिती वाईट दिसून आली. बासित म्हणाला “भारताने पहिली कसोटी सहज जिंकली. भारत आणि पाकिस्तानच्या संघांमध्ये खूप फरक आहे. बांगलादेशला हे समजले असेल. त्यांच्या आणि बांगलादेशच्या क्रिकेटमध्ये काय फरक आहे ते भारताने सांगितले आहे.”