मंगळवारी (१२ जुलै) भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेला एकदिवसीय सामना ऐतिहासिक ठरला. या सामन्यात अनेक जुने विक्रम मोडीत निघाले तर अनेक नवीन विक्रम प्रस्थापित झाले. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात भारताने प्रथमच इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. जगभर दबदबा असलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी डोके वरती काढू दिले नाही. विशेषत: जसप्रीत बुमराहने सहा बळी घेऊन इंग्लिश फलंदाजीचे कंबरडेच मोडले. आपल्या पतीच्या कामगिरीमुळे आनंदी झालेल्या संजना गणेशनने इंग्लंडच्या फलंदाजांना आणि चाहत्यांना अतिशय गमतीशीरपणे ट्रोल केले आहे.
जसप्रीत बुमराहने ओव्हल क्रिकेट स्टेडियमवरती झालेल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचे एकूण सहा गडी बाद केले. त्यातील तिघांना तर त्याने खातेही उघडू दिले नाही. आपल्या या कामगिरीमुळे त्याने चाहत्यांची मने जिंकली. त्यानंतर त्याची पत्नी संजना गणेशनही खूप आनंदी दिसत होती. संजना सोनी स्पोर्ट्स वाहिनीसाठी ‘प्रेझेंटर’ म्हणून काम करत आहे. त्यामुळे सध्या तीदेखील इंग्लंडमध्येच आहे. सोनी वाहिनीने तिचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सामन्याचे विश्लेषण करताना तिने इंग्लंडचे फलंदाज आणि चाहते यांना ट्रोल केले आहे.
इंग्लंडच्या चाहत्यांना ट्रोल करताना संजना म्हणाली, “खाण्यापिण्याच्या स्टॉल्समध्ये इंग्लंडच्या चाहत्यांची भरपूर गर्दी आहे. कारण त्यांना क्रिकेट बघायचे नाही. शिवाय, येथे एक दुकानं आहेत जिथे येणे इंग्लंडच्या फलंदाजांना अजिबात आवडणार नाही. कारण त्याचे नाव ‘क्रिस्पी डक’ असे आहे. मलाही एक ‘डक रॅप’ मिळाला आहे. मैदानाबाहेर ‘डक’ची चव कशी आहे, हे मला बघायचे आहे. कारण, मैदानावरील ‘डक’ पूर्णपणे विलक्षण दिसले”. संजनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
हेही वाचा – VIDEO : रोहितच्या षटकारामुळे चिमुकली जखमी; स्टेडियममधील काळजाचा ठोका चुकवणारा क्षण
इंग्लंडला ट्रोल करण्याव्यतिरिक्त संजनाने जसप्रीतसाठी एक खास इन्स्टाग्राम स्टोरीदेखील शेअर केली आहे. संजनाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये जसप्रीतचा फोटो शेअर केला आहे. त्या फोटोवर तिने ‘धिस बॉय’, असे शब्द लिहून निळ्या रंगाचा बदाम टाकला आहे.
भारताच्या विजयात जसप्रीत बुमराहचा मोठा वाटा आहे. त्याने ७.२ षटकांत १९ धावा देत सहा बळी घेतले. ही कामगिरी करून बुमराहने कुलदीप यादवचा विक्रम मोडीत काढला आहे. यादवने २०१८मध्ये नॉटिंगहॅम येथील सामन्यात २५ धावांत सहा बळी घेतले होते.