भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मंगळवारी (१२ जुलै) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना केनिंग्टन ओव्हलवर झाला. भारताने या सामन्यात इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. जसप्रीत बुमराहचे सहा बळी आणि कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, ही या सामन्याची वैशिष्ट्ये ठरली. या दरम्यान, मैदानावर एक क्षण असा आला की, स्वत: रोहित शर्मादेखील काळजीत पडला होता.

पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या दुसर्‍या डावात भारताने फलंदाजी केली. इंग्लंडने दिलेले १११ धावांचे लक्ष पार करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी भारतीय डावाची सुरुवात केली होती. फलंदाजी करत असताना रोहितच्या एका फटक्यामुळे प्रेक्षकांमध्ये बसलेली लहान मुलगी जखमी झाली. चेंडू लागताच ही मुलगी किंचाळू लागली. ही बाब लक्षात येताच मैदानाच्याकडेला उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या फिजिओने लगेचच त्या मुलीकडे धाव घेतली.

भारताच्या फलंदाजीदरम्यान रोहित शर्माने पाचव्या षटकात डेव्हिड विलीच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला होता. हा चेंडू थेट प्रेक्षकांच्या स्टँडमध्ये गेला. त्यानंतर एक माणूस मुलीला आपल्या हातांवर घेऊन उभा राहिल्याचे दिसले. ही मुलगी रोहितने मारलेल्या चेंडूमुळे जखमी झाल्याचे समजताच तिला वैद्यकिय मदत पुरवण्यात आली. इंग्लंडच्या फिजिओंच्या तत्परतेचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.

Story img Loader