ओव्हल क्रिकेट स्टेडयमवरती झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यात भारतीय खेळाडूंनी अनेक विक्रमांना गवसणी घातली. कर्णधार रोहित शर्माने नाबाद ७६ धावांची खेळी करून भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. आपल्या अर्धशतकादरम्यान त्याने सहा चौकार आणि पाच षटकार लगावले. अशी कामगिरी करून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५० षटकांरांचा टप्पा पार केला.
इंग्लंडने दिलेल्या १११ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनी ११४ धावांची भागीदारी करून भारताला विजय मिळवून दिला. भारताने एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रथमच इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. रोहितने आपल्या फलंदाजीदरम्यान मारलेल्या षटकारांच्या जोरावर शाहिद आफ्रिदी आणि ख्रिस गेलचा विक्रम मोडला.
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये २५९ डावांमध्ये २५० षटकार मारले होते. तर, वेस्ट इंडीजच्या ख्रिस गेलने २६८ डावांमध्ये हा टप्पा पार केला होता. रोहित शर्माने मात्र, केवळ २२४ डावांमध्येच २५० षटकार पूर्ण केले. त्यामुळे रोहित शर्मा सर्वात कमी डावात २५० षटकार मारणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर हा नवा विश्वविक्रम नोंदवला गेला आहे.