भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला मंगळवारी (१२ जुलै) सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. जसप्रीत बुमराहचे सहा बळी आणि कर्णधार रोहित शर्माचे अर्धशतक, ही या सामन्याची वैशिष्ट्ये ठरली. भारताची फलंदाजी सुरू असताना मैदानावर एक क्षण असा आला की, स्वत: रोहित शर्मादेखील काळजीत पडला होता. त्याने मारलेल्या एका पुल शॉटमुळे प्रेक्षकांमध्ये बसलेली एका चिमुकली जखमी झाली होती. सामना संपल्यानंतर रोहितने त्या मुलीची भेट घेतली.

भारताची फलंदाजी सुरू असताना पाचव्या षटकात रोहित शर्माने डेव्हिड विलीचा चेंडू फाइन लेगच्या दिशेने उडवला. हा चेंडू प्रेक्षकांमध्ये बसलेल्या एका छोट्या क्रिकेट चाहतीला लागला. पंचांनी षटकाराचा इशारा दिल्यानंतर कॅमेरामनने पुन्हा कॅमेरा स्टँडकडे वळवला. तेव्हा एक व्यक्ती मुलीला आपल्या हातांवर घेऊन उभा राहिल्याचे दिसले. ही मुलगी रोहितने मारलेल्या चेंडूमुळे जखमी झाल्याचे समजताच मैदानाच्याकडेला उपस्थित असलेल्या इंग्लंड संघाच्या फिजिओने लगेचच त्या तिच्याकडे धाव घेतली होती.

फिजिओंनी तपासणी करून तीला फारच किरकोळ दुखापत झाल्याचे सांगितले. मात्र, रोहित शर्मा यावरती समाधानी नव्हता. सामना संपल्यानंतर त्याने ड्रेसिंग रूममध्ये जाण्याऐवजी त्या चिमुकलीकडे धावा घेतली. त्याने तिची विचारपूस करून तिला चॉकलेटदेखील दिले. त्याच्या या कृतीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मा स्वत: एका मुलीचा पिता असल्यामुळे कदाचित तो जखमी झालेल्या मुलीची काळजी करण्यापासून स्वत:ला रोखू शकला नाही.

Story img Loader