Shikhar Dhawan and Virat Kohli Celebration: भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना मंगळवारी (१२ जुलै) केनिंग्टन ओव्हल मैदानावर झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा १० गडी राखून पराभव केला. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन यांना नाबाद राहून १११ धावांचे लक्ष्य पार केले. सामना जिंकल्यानंतर सर्व खेळाडूंनी आपापल्या पद्धतीने आनंद व्यक्त केला. भारतीय संघाचा ‘गब्बर’ अशी ओळख असलेल्या शिखरने एका खास व्यक्तीसोबत फोटो काढून विजयाचा आनंद साजरा केला.

भारत आणि इंग्लंडदरम्यान झालेला सामना हा शिखर धवनच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १५०वा सामना होता. या सामन्यात तो ३१ धावांवर नाबाद राहिला. सामन्यानंतर त्याने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीसोबत फोटो काढून आनंद साजरा केला. दोघांचा हा फोटो चाहत्यांना खूप आवडला आहे.

Shikhar Dhawan and Virat Kohli
शिखर धवनने शेअर केलेली इन्स्टाग्राम स्टोरी

धवनने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर कोहलीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. “१५०वा एकदिवसीय सामना जिंकल्यानंतरचा आनंद”, अशी कॅप्शन या फोटोला देण्यात आली आहे. धवनने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोन्ही क्रिकेटपटू आनंदी दिसत आहेत. मांडीतील स्नायूंच्या दुखापतीमुळे विराट कोहली मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळू शकला नाही. त्याच्या जागी श्रेयस अय्यरचा संघात समावेश करण्यात आला होता.

हेही वाचा – ENG vs IND 1st ODI : जसप्रीत बुमराहच्या पत्नीचा ‘ऑफ फिल्ड’ जलवा; इंग्लंडच्या फलंदाजांना केले ट्रोल

विराटसोबत फोटो शेअर केल्यानंतर शिखर धवने आपला सलामीचा जोडीदार रोहित शर्मासाठीदेखील एक खास पोस्ट केली आहे. शतकी भागीदारी केल्यानंतर धवनने सोशल मीडियावर रोहितसोबत फोटो शेअर केला. “९ वर्षांनंतरही जोडी मजबूत आहे, शानदार विजयासाठी भारतीय संघाचे अभिनंदन”, असे कॅप्शन या फोटोला दिले आहे.

धवन आणि रोहितने पुन्हा एकदा शतकी भागीदारी करून संघाला विजय मिळवून दिला. दोघांच्या नावावर एका खास विक्रमाची नोंद झाली. रोहित-धवन या सलामीच्या जोडीने ११२ सामन्यात भारतासाठी पाच हजार १०८ धावा केल्या आहेत. त्यांच्यापूर्वी सचिन आणि गांगुलीने अशी कामगिरी केली होती.