भारताचा इंग्लंड दौरा मैदानाबरोबरच मैदानाबाहेरील घडामोडींसाठी देखील चर्चेत आहे. सोशल मीडियावर दोन्ही देशांच्या आजी-माजी खेळाडूंनी एकमेकांच्या संघाविरोधात जोरदार प्रतिक्रिया देण्याचा धडाका सुरू केला आहे. सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा विषय आला म्हणजे त्यात वसिम जाफर आणि मायकल वॉन ही जोडी नेहमीच आघाडीवर असते. आता देखील वसिम जाफरने आपल्या भन्नाट शैलीमध्ये जसप्रीत बुमराहचे कौतुक करून इंग्लंडची खिल्ली उडवली आहे.

तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांची वाताहत केली. केनिंग्टन ओव्हलवर झालेल्या या सामन्यात जसप्रीत बुमराहने त्याच्या सुरुवातीच्या स्पेलमध्ये चार बळी घेतले. त्याच्या कामगिरीवर आनंदी झालेल्या वसिम जाफरने आपल्या खास शैलीत त्याचे कौतुक केले. “अ‍ॅलेक्सा प्ले जसप्रीत बुमराह. सॉरी जसप्रीत बुमराह इज अनप्लेयेबल”, असे ट्वीट त्याने केले आहे.

जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच षटकात जेसन रॉय आणि जो रूटला झटपट बाद केले. दोघेही खातेदेखील उघडू शकले नाहीत. त्यानंतर, बुमराहने जॉनी बेअरस्टो आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांनाही स्वस्तात माघारी धाडले. त्याच्या या कामगिरीनंतर वसिम जाफरने लगेच ट्वीट केले.

हेही वाचा – IND vs ENG 1st ODI : ओव्हल मैदानावर जसप्रीत बुमराहचा धुमाकूळ; भेदक गोलंदाजीसमोर यजमानांच्या दांड्या गुल

संपूर्ण सामन्यात जसप्रीत बुमराहने ७.२ षटकांमध्ये केवळ १९ धावा देऊन सहा बळी घेतले. या दरम्यान त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील दुसरा ‘फाइव्ह विकेट हॉल’ पूर्ण केला. ओव्हलमध्ये मर्यादित षटकांच्या सामन्यात पाच बळी घेणारा बुमराह हा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.

Story img Loader