India vs England T20 Result : कसोटी मालिका पार पडल्यानंतर भारत आणि इंग्लंड आता टी २० सामन्यांमध्ये आपापली क्षमता सिद्ध करण्यासाठी जोर लावणार आहे. या मालिकेतील पहिला सामना साउथॅम्प्टनमधील ‘द रोज बाऊल’ स्टेडियममध्ये झाला. हा सामना जिंकून भारताने विजयी सलामी दिली आहे. भारताने यजमान इंग्लंडचा ५० धावांनी पराभव केला. निर्धारित २० षटकांमध्ये भारताने आठ बाद १९८ धावा केल्या होत्या.

भारताने विजयासाठी दिलेले १९९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच षटकात भुवनेश्वर कुमारने कर्णधार जोस बटलरला खाते न उघडू देता माघारी धाडले. त्यानंतर पाचव्या षटकात हार्दिक पंड्याने डेव्हिड मलान आणि लियाम लिव्हिंगस्टोन यांना एकापोठ बाद केले. यानंतर इंग्लंडची फलंदाजी सपशेल ढेपाळली. ठराविक अंतराने भारतीय गोलंदाज बळी मिळवत गेले आणि इंग्लंडचा संपूर्ण डाव १९.३ षटकांमध्येच गुंडाळला गेला. १४८ धावांवर इंग्लंडचा सर्व संघ गारद झाला.

इंग्लंडच्यावतीने मोईन अलीने सर्वाधिक ३६ धावा केल्या. त्यामध्ये चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. भारतीय गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास हार्दिक पंड्याला चार बळी मिळाले. पदार्पणवीर अर्शदीप सिंग आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी दोन बळी मिळाले. तर, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी इंग्लंडचा एक-एक गडी बाद केला.

हेही वाचा – IND vs ENG 1st T20: रोहित शर्माने ‘अशा’ प्रकारे केले विराट कोहलीला ओव्हरटेक

त्यापूर्वी, भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिला बळी रोहित शर्माचाच गेला. त्याने १४ चेंडूत २४ धावा केल्या. त्यानंतर सर्व भारतीय फलंदाजांनी आक्रमक फटकेबाजी करत धावफलक हलता ठेवला. दीपक हुडा (३३) आणि सुर्यकुमार यादव (३९) यांनी कमी चेंडूमध्ये जास्त धावा केल्याने भारताचा धावफलक दीडशेपार गेला. त्यानंतर आलेल्या हार्दिक पंड्याने अप्रतिम फलंदाजी करत आपल्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील पहिले अर्धशतक साजरे केले. तो ५१ धावा करून बाद झाला होता. अष्टपैलू कामगिरीमुळे पंड्याला सामनाविराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.

पहिला टी २० सामना जिंकून भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग १८वा विजय ठरला आहे. मालिकेतील दुसरा सामना ९ जुलै रोजी बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

Story img Loader