भारत आणि इंग्लंड दरम्यान तीन टी २० सामन्यांची मालिका सुरू झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना काल (७ जुलै) साउथॅम्प्टनमधील ‘द रोज बाऊल’ स्टेडियममध्ये खेळवला गेला. कोविड-१९ पॉझिटिव्ह आढळल्यामुळे बर्मिंगहॅममधील पाचव्या कसोटीतून बाहेर पडलेला कर्णधार रोहित शर्मा या सामन्याच्या माध्यमातून मैदानावर परतला. रोहित शर्माने पहिल्या सामन्यात विराट कोहलीचा एक विक्रम मागे सोडला.
नाणेफेक जिंकून कर्णधार रोहित शर्माने प्रथम फलंदाजी स्वीकारली होती. ईशान किशनच्या साथीने त्याने स्वत: डावाची सलामी दिली. कोरोनातून बरे झाल्यानंतर रोहितचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता. त्याने १४ चेंडूंत चार षटकांरांच्या मदतीने २४ धावा केल्या. यादरम्यान त्याने टी २० कर्णधार म्हणून सर्वात वेगवान एक हजार धावा पूर्ण केल्या.
रोहित शर्माने २९ डावांमध्ये अशी कामगिरी केली आहे. यापूर्वी विराट कोहलीने ३० डावांमध्ये कर्णधार म्हणून एक हजार धावा केल्या होत्या. विराट कोहलीने टी २० कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला भारतीय संघाचा पूर्णवेळ कर्णधार बनवण्यात आले आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकामध्ये तो भारतीय संघाचे नेतृत्व करेल.