England defeated India by 28 runs in the first test match in Hyderabad : भारत आणि इंग्लंड संघांतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना रविवारी हैदरबादमध्ये पार पडला. या सामन्यात इंग्लंडने भारताचा २८ धावांनी पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिकेत १-० ने अशी आघाडी घेतली आहे. भारताला विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य मिळाले होते, मात्र भारतीय संघा २०२ धावांत गारद झाला. फिरकीपटूंना अनुकूल अशा खेळपट्टीवर भारतीय संघ आपल्याच जाळ्यात अडकला. या सामन्यात इंग्लंडच्या शानदार विजयाचे शिल्पकार ऑली पोप आणि सात विकेट्स घेणारा टॉम हार्टली ठरले.
या सामन्यात इंग्लंडच्या फिरकीपटूंनी एकूण १८ विकेट्स घेतल्या. दोन्ही डावात भारताचा एकच फलंदाज धावबाद झाला. या सामन्यात जवळपास मागे पडलेल्या इंग्लंड संघाचे ऑली पोपने १९६ धावांची खेळी करत शानदार पुनरागमन केले. यानंतर, उर्वरित काम इंग्लिश फिरकी गोलंदाज टॉम हार्टलीने केले, जो पदार्पण कसोटी खेळत होता. हार्टलीने सात विकेट्स घेतल्या.
पहिल्या डावात १९० धावांनी पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडने भारताला २३१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात टीम इंडिया २०२ धावांवर गारद झाली. भारताकडून दुसऱ्या डावात रोहित शर्माने सर्वाधिक ३९ धावा केल्या. यष्टिरक्षक केएस भरतने २८ धावा केल्या आणि फिरकी अष्टपैलू रविचंद्रन अश्विननेही २८ धावा केल्या. इंग्लंडकडून नवोदित टॉम हार्टलीने सात विकेट्स घेतल्या. याशिवाय जो रूट आणि जॅक लीच यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
हेही वाचा – WI vs AUS : वेस्ट इंडिजचा ऐतिहासिक विजय अन् समालोचनादरम्यान ब्रायन लाराला अश्रू अनावर, VIDEO व्हायरल
या सामन्यात चौथ्या दिवसाच्या सुरुवातीपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत होता, मात्र चौथ्या दिवसाच्या शेवटी इंग्लंडने आश्चर्यकारक कामगिरी करत सामना जिंकला. १९० धावांनी पिछाडीवर असताना इंग्लंडने हा सामना जिंकला. इंग्लंडच्या या ऐतिहासिक विजयाचे शिल्पकार होते दुसऱ्या डावात १९६ धावा करणारा ऑली पोप आणि दुसऱ्या डावात सात विकेट्स घेणारा टॉम हार्टली. भारतीय संघ घरच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना इंग्लंडविरुद्धच हरला होता.