भारत आणि इंग्लंड यांच्यात सध्या पहिला कसोटी सामना सुरु आहे. या दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने दुसऱ्या डावात १ बाद ९ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा सलामीवीर अॅलिस्टर कुक याला पुन्हा एकदा अश्विनने त्रिफळाचित केले होते. तत्पूर्वी, भारताचा डाव सर्वबाद २७४ धावात आटोपला. एका वेळी बलाढ्य वाटणाऱ्या २८७ धावांचा पाठलाग करताना विराटने अप्रतिम १४९ धावांची खेळी केली. ‘साहेबां’च्या भूमीवर त्याने पहिले आणि कारकिर्दीतील २२वे शतक ठोकले. त्याला उमेश यादवने १६ चेंडूत नाबाद १ धाव, तर इशांत शर्माने १७ चेंडूत ५ धावा काढत त्याला चांगली साथ दिली. याशिवाय, इतर फलंदाज आपला प्रभाव पडू शकले नाहीत. इंग्लंडतर्फे कुर्रानने ४ तर रशीद, स्टोक्स आणि अँडरसनने २-२ गडी बाद केले.

या दिवसअखेर इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन याने एक मुलाखती दरम्यान कोहलीच्या फलंदाजीबाबत एक विशेष अशी टीपण्णी केली. तो म्हणाला की कोहली ऑफ स्टम्पच्या बाहेरचे चेंडू फार ताकदीने टोलवतो. त्याच्या त्या फटक्याने मला कायम त्याला बाद करण्याची आशा वाटत होती आणि मी गेममध्ये होतो, असे तो म्हणाला.

‘बेन स्टोक्स माझ्याजवळ येऊन मला म्हणाला कि कोहली क्रीजच्या बाहेरील चेंडू बाहेरच ताकदीने टोलवताना दिसतो आहे. त्यामुळे मी चौथ्या स्टम्पवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. पण वाऱ्याच्या दिशेमुळे चेंडू मला हवा त्या प्रकारे स्विंग झाला नाही.  कोहलीला ‘आऊट’ करणं सोपं जाऊ शकलं असतं. त्याच्या त्या फटक्यांमुळे त्याचा बळी टिपण्याची ती संधी आहे, असे मला सारखे वाटत होते आणि म्हणून मी गेममध्ये राहत होतो, असे त्याने स्पष्ट केले.