Indian team took a lead of 190 runs against England on the strength of the first innings : भारत आणि इंग्लंड संघांतील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने पहिल्या डावात सर्वबाद २४६ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून कर्णधार बेन स्टोक्सने सर्वाधिक ७० धावांची खेळी साकारली. प्रत्युत्तरात भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद ४३६ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघाने १९० धावांची आघाडी घेतली आहे. भारताकडून यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, केएस भरत आणि रवींद्र जडेजा यांनी अर्धशतके झळकावली.
टीम इंडियाचा पहिला डाव तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रातच आटोपला. रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल फलंदाजी करत असताना भारताने ४२१/७ धावसंख्येसह तिसऱ्या दिवसाची सुरुवात केली. मात्र दिवसाची सुरुवात झाल्यानंतर अवघ्या काही षटकांचा खेळ सुरू असताना जो रूटने शतकाकडे वाटचाल करणाऱ्या रवींद्र जडेजाला बाद केले. भारताकडून रवींद्र जडेजाचे शतक हुकले. तो ८७ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. तर केएल राहुलने ८६ धावांची खेळी साकारली. जो रूटने चार विकेट घेतल्या. जो रूटचा कसोटीतील हा दुसरा सर्वोत्तम गोलंदाजी स्पेल आहे. यापूर्वी २०२१ मध्ये त्याने अहमदाबादमध्ये भारताविरुद्ध आठ धावांत पाच विकेट्स घेतल्या होत्या.
त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने फलंदाजीसाठी आलेल्या जसप्रीत बुमराहला गोल्डन डकवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर पुढच्याच षटकात रेहान अहमदने अक्षर पटेलला बोल्ड करून भारताची १०वी विकेट घेतली.भारतीय संघाला तिसऱ्या दिवशी अवघ्या १५ धावा करता आल्या आणि यादरम्यान त्यांनी तीन विकेट गमावल्या. इंग्लिश फिरकीपटूंनी भारताला तिन्ही धक्के दिले. इंग्लंडकडून जो रूटने डावात सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा – Tanmay Agarwal : सर्वात जलद त्रिशतक झळकावत रिचर्ड्स-सेहवागचा विक्रम मोडणारा, कोण आहे तन्मय अग्रवाल?
पहिल्या डावात फलंदाजीला उतरतलेल्या कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांनी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८० धावा (७५ चेंडू) जोडल्या, त्यानंतर रोहित शर्मा (२४) तेराव्या षटकात जॅक लीचच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर शतकाकडे वाटचाल करणारा यशस्वी जैस्वाल २४व्या षटकात जो रूटचा बळी ठरल्याने डाव काही काळ स्थिरावला होता. जैस्वालने वेगवान फलंदाजी करत ७४ चेंडूत १० चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ८० धावा केल्या.