भारतीय क्रिकेट संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही देशांदरम्यान तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना क्रिकेटची पंढरी अशी ओळख असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती खेळवला जात आहे. या सामन्यासाठी भारताच्या अनेक माजी खेळाडूंनी उपस्थिती दर्शवल्याचे दिसले. विशेष म्हणजे २०११च्या विश्वचषक विजेत्या संघातील निम्म्यापेक्षा जास्त खेळाडू पुन्हा एकत्र दिसले.
भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून इंग्लंडला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रण दिले. इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना भारताचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर एकत्र सामना बघताना दिसले. यावेळी सचिनसोबत त्याची पत्नी अंजलीदेखील होती. याशिवाय, सुरेश रैना आणि भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीही या सामन्याचा आनंद लुटताना दिसले. माजी फिरकीपटू हरभजन सिंहदेखील लॉर्ड्समध्ये उपस्थित असल्याचे दिसले.
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी लंडनला गेला होता. तेव्हापासून तो तिथेच आहे. काही दिवसांपूर्वीच धोनी, पार्थिव पटेल आणि ऋषभ पंत लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले होते. याशिवाय, भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री आणि सुनील गावसकर समालोचनाच्या निमित्त लॉर्ड्समध्ये उपस्थित आहेत.