Virat Kohli and Jonny Bairstow : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एजबस्टन कसोटी सामन्यात विराट कोहली आणि जॉनी बेयरस्टोचा वाद झाला होता. त्या सामन्याचा तिसरा दिवस त्यांच्या वादामुळे आणि बेअरस्टोच्या शतकामुळे चांगलाच गाजला होता. दोघांमधील शाब्दिक बाचाबाचीची प्रचंड चर्चा झाली होती. मात्र, आता दोघांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसत आहे. सोनी स्पोर्ट्स नेटवर्कने दोघांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये जॉनी बेअरस्टो विराट कोहलीच्या दुखापतीची चौकशी करत असल्याचे दिसत आहे.

भारत आणि इंग्लंडदरम्यान आज (१४ जुलै) लॉर्ड्स क्रिकेट स्टेडियमवरती दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. मांडीचे स्नायू दुखावल्यामुळे विराट कोहलीला तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना खेळता आला नव्हता. आजच्या सामन्यात मात्र तो खेळत आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या खेळाडूंनी काही वेळ मैदानावर ‘वॉर्मअप’ केले. या दरम्यान इंग्लंडचा स्फोटक फलंदाज जॉनी बेअरस्टोने आवर्जून विराट कोहलीच्या दुखापतीची विचारपूस केली. दोघेही बराचवेळ एकमेकांशी बोलताना दिसले. त्यावरून दोघांमधील वाद मिटला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१ ते ५ जुलै दरम्यान एजबस्टन येथे झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यात इंग्लंडची फलंदाजी सुरू असताना ३२व्या षटकात विराट आणि जॉनी दरम्यान वाद झाला होता. विराट कोहली स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करत होता. मोहम्मद शमीने फेकलेला चेंडू बेअरस्टोच्या अंगावर लागला. त्यानंतर विराट कोहली बेअरस्टोला काहीतरी बोलला. बेअरस्टोनेही त्याला उत्तर दिले. यानंतर विराट कोहली आणि जॉनी बेअरस्टो यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती.

Story img Loader