India vs England t20 Result: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा आज (९ जुलै) बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर झाल. भारताने एजबस्टन कसोटीचा वचपा काढत आजचा सामना ४९ धावांनी जिंकला. भारताने दिलेले १७१ धावांचे आव्हान पार करताना इंग्लंडचा सर्व संघ १२१ धावांमध्ये बाद झाला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताला २-० अशी विजयी आघाडी मिळाली आहे. पहिला सामनादेखील भारताने ५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकलेला आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारताने निर्धारित २० षटकांमध्ये आठ गडी गमावून १७० धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ १७ षटकांतच गारद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक ३५ आणि डेव्हिड विलीने नाबाद ३३ धावा केल्या. भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे यजमानांच्या फलंदाजांनी माना टाकल्या. भुवनेश्वर कुमारने डावाच्या पहिल्याच चेंडूवर जेसन रॉयला बाद करून आपल्या कामगिरीची झलक दाखवली. भारताच्यावतीने त्याने सर्वाधिक तीन बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि युझवेंद्र चहलने प्रत्येकी दोन बळी घेतले. तर, हार्दिक पंड्या आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येक एक गडी बाद केला.
त्यापूर्वी, प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने रोहित शर्मासोबत ऋषभ पंतला सलामीसाठी पाठवले. दोघांनी जोरदार फटकेबाजी करत भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. मात्र, पाचव्या षटकाच्या चेंडूवर रिचर्ड ग्लीसनच्या गोलंदाजीवर जोस बटलरने रोहितचा झेल टिपला. तो २० चेंडूत ३१ धावा करून बाद झाला. ग्लीसनच्या आंतरराष्ट्रीय टी २० कारकिर्दीतील तो पहिला बळी ठरला. त्यानंतर विराट कोहली (१) आणि ऋषभ पंत (२६) यांनाही ग्लीसनने माघारी धाडले. भारतीय फलंदाजीदेखील ढेपाळ्याच्या स्थितीमध्ये आली होती. मात्र, रविंद्र जडेजाने पाच चौकारांच्या मदतीने २९ चेंडूंमध्ये ४६ धावांची नाबाद खेळी करून भारताचा डाव सावरला.
भारताने मालिकेतील सलग दुसरा टी २० सामना जिंकून भारताने मालिकाही जिंकली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा हा सलग सातवा मालिका विजय आहे. आजच्या सामन्यात चमकदार कामगिरी करणाऱ्या भुवनेश्वर कुमारला सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
रोहित शर्माने अभिमानाने सांगितले विजयाचे महत्त्व
सामन्यासह मालिका जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ‘क्लिनिकल गेम’ असे म्हणत भारतीय संघ कसा व्यावसायिक खेळ करत आहे हे अधोरेखीत केले. भारताने केवळ सामनाच जिंकला नाही तर जसे धोरण आखले आणि जसे नियोजन केले तसाच खेळ करून विजय मिळवल्याचे त्याने सांगितले. “या खेळपट्टीवर किती धावा होऊ शकतात, त्या केल्यावर इंग्लंडला कसे रोखायचे याची सगळी योजना आम्ही तयार केली होती. ती योजना आहे तशी अंमलात आणण्यात आम्हाला यश आले”, असे रोहित म्हणाला.