India vs England t20 Playing 11: भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची टी २० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा आज (९ जुलै) बर्मिंगहॅम येथील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजल्यापासून खेळाला सुरुवात होईल. भारताने मालिकेतील पहिला सामना ५० धावांच्या मोठ्या फरकाने जिंकलेला आहे. त्यामुळे भारताकडे मालिकेत १-० अशी आघाडी आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघामध्ये मोठे बदल होण्याची शक्यता आहे.

विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांसारखे वरिष्ठ खेळाडू आजच्या सामन्यासाठी संघात सामील झाले आहेत. अशा स्थितीत भारतीय संघाला अधिक बळ मिळेल. मात्र, संघात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाला वगळायचे याबाबत कर्णधार रोहित शर्मा आणि संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी नक्कीच वाढली असेल.

या सामन्यात रोहित शर्मा तीन बदल करू शकतो. दीपक हुडा, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंग यांच्या जागी तो विराट कोहली, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करू शकतो. याशिवाय ऋषभ पंत आणि दिनेश कार्तिक यापैकी एकाला बाहेर बसावे लागेल.

एजबस्टनमधील हवामानाचा आढावा घेतल्यास, ९ जुलै रोजी बर्मिंगहॅममध्ये दिवसाचे तापमान सुमारे १९ अंश सेल्सिअस असेल अशी अपेक्षा आहे. खेळादरम्यान पावसाची शक्यता नाही. एजबस्टनची खेळपट्टी फलंदाजीसाठी पोषक आहे. मात्र, सामन्याच्या उत्तरार्धात वेगवान गोलंदाजांना मदत होऊ शकते. मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंना चांगली कामगिरी करण्याची संधी मिळू शकते.

हेही वाचा – IND vs ENG T20 Series : एजबस्टनमधील सामन्यात वर्णद्वेषाचा सामना करण्यासाठी वॉरविकशायरचा खास प्लॅन

या मैदानावरील गेल्या पाच टी २० सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७० धावांची आहे. त्यामुळे आज उच्च धावसंख्येचा सामना बघायला मिळू शकतो. दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाचा विक्रम येथे चांगला नाही. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, युझवेंद्र चहल.

इंग्लंड संभाव्य संघ: जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, हॅरी ब्रूक, सॅम कुरन, क्रिस जॉर्डन, मॅट पार्किंसन, रीस टॉपली, रिचर्ड ग्लीसन किंवा टायमल मिल्स.

Story img Loader