भारतीय क्रिकेट संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा २-१ अशा फरकाने पराभव करून ऐतिहासिक कामगिरी केली. या कामगिरीनंतर खेळाडूंनी अगदी शाळकरी मुलांप्रमाणे धिंगाणा घालून विजयाचा आनंद साजरा केला. विशेषतः ऋषभ पंत आणि विराट कोहली मस्तीच्या मूडमध्ये दिसले. त्या दोघांसह इतर काही खेळाडूंनी फोटो काढताना कर्णधार रोहित शर्माला शॅम्पेनच्या बाटलीने अक्षरश: आंघोळ घातली. रोहित शर्माला खेळाडूंचा धिंगाणा आवरताना नाकी नऊ आल्याचे दिसले. या घटनेच्या व्हिडीओला सोशल मीडियावर चाहत्यांना खूप प्रतिसाद मिळत आहे.
मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने अप्रतिम खेळ दाखवला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. तिसऱ्या सामन्यातील विजयामुळे भारताला मालिकाही जिंकता आली. इंग्लंडमध्ये द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याची भारताची ही तिसरीच वेळ आहे. त्यामुळे ऐतिहासिक कामगिरी केल्यानंतर खेळाडूंच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी मनसोक्त आनंद साजरा केला.
अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या हार्दिक पंड्याला ‘मालिकावीर’ आणि शतक झळकावणाऱ्या ऋषभ पंतला ‘सामनावीर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. दोघांनाही शॅम्पेनच्या बाटल्या देण्यात आल्या. याशिवाय, क्रिकेटमधील प्रथेनुसार मालिका विजेत्या संघालाही शॅम्पेनची बाटली देण्यात आली. या तीन बाटल्या घेऊन भारतीय खेळाडूंनी एकमेकांच्या अंगावरती शॅम्पेन उडवली. कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे भिजला होता.
इंग्लंडमध्ये द्विपक्षीय एकदिवसीय मालिका जिंकण्याची कामगिरी करणारा रोहित हा भारताचा तिसरा कर्णधार ठरला. यापूर्वी, मोहम्मद अजहरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताने १९९० मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा एकदिवसीय मालिका जिंकली होती. त्यानंतर, २०१४मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने दुसऱ्यांदा अशी कामगिरी केली होती.