India vs England t20 result : भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (१० जुलै) झाला. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरती झालेली ही लढत यजमान इंग्लंडने १७ धावांनी जिंकली. या विजयासह इंग्लंडने व्हाईट वॉशची नामुष्की टाळण्यात यश मिळवले आहे. तीन सामन्यांची ही मालिका भारताने २-१ अशी जिंकली आहे. भारताने निर्धारित २० षटकांमध्ये १९८ धावा केल्या.
यजमान इंग्लंडने भारताला विजयासाठी २१६ धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंडमधील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ऋषभ पंत एक धाव करून बाद झाला. त्यानंतर आलेल्या विराट कोहलीने पुन्हा एकदा चाहत्यांची निराशा केली. तो ११ धावा करून माघारी गेला. त्यापाठोपाठ कर्णधार रोहित शर्मादेखील (११) लवकर बाद झाला. यानंतर मात्र, सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. अय्यरने २८ धावांची खेळी केली.
चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या सूर्यकुमार यादवने अवघ्या ४८ चेंडूत शतक झळकावले. आंतरराष्ट्रीय टी २० क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा भारतीय ठरला आहे. तर, चौथ्या क्रमांकावर शतक झळकावणारा तो केएल राहुलनंतर दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने ५५ चेंडूत १४ चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने ११७ धावांची अप्रतिम खेळी केली. मात्र, तरीदेखील भारताला निर्धारित २० षटकांमध्ये भारताला २१६ धावांचे लक्ष्य पार करता आले नाही.
त्यापूर्वी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. इंग्लंडने २० षटकांमध्ये सात गड्यांच्या बदल्यात २१५ धावा केल्या होत्या. इंग्लंडच्यावतीने लियाम लिव्हिंगस्टोनने नाबाद ४२ धावांची खेळी केली तर, डेव्हिड मलानने ७७ धावा केल्या.
आज पार पडलेल्या टी २० मालिकेनंतर भारताला आता इंग्लंविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळायची आहे. १२ जुलैपासून ही मालिका सुरू होईल.