India vs England 3rd t20 Playing 11 : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी २० मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना आज (१० जुलै) होणार आहे. नॉटिंगहॅममधील ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडियमवरती ही लढत होईल. भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता खेळाला सुरुवात होईल. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताकडे २-०अशी विजयी आघाडी आहे. त्यामुळे आजचा सामना जिंकून इंग्लंडला त्यांच्याच भूमीत क्लिनस्विप देण्याची सुवर्णसंधी रोहितच्या संघाकडे आहे.
भारताने इंग्लंडविरुद्धचा पहिला टी २० आंतरराष्ट्रीय सामना ५० धावांनी आणि दुसरा सामना ४९ धावांनी जिंकला आहे. आज होणारा तिसरा सामना जर भारतीय संघाने जिंकला तर इतिहासात प्रथमच इंग्लंडला भारताकडून क्लिनस्विप मिळले. तर शेवटचा सामना जिंकून आपला ‘सफाया’ टाळण्यासाठी जोस बटलरचा संघ प्रयत्न करेल.
सामन्यादरम्यान नॉटिंगहॅममध्ये ताशी १० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. खेळादरम्यान पावसाची शक्यता नाही. येथील दिवसाचे तापमान १९ अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ट्रेंट ब्रिजची खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल आहे. त्यामुळे येथे फलंदाज मोठी धावसंख्या उभारताना दिसण्याची शक्यता आहे. सामन्याच्या उत्तरार्धात वेगवान गोलंदाजांना थोडीफार मदत मिळू शकते. तर, मधल्या षटकांमध्ये फिरकीपटूंचे वर्चस्व अपेक्षित आहे.
अशा स्थितीत रवींद्र जडेजा आणि हार्दिक पंड्या यांनी अष्टपैलू कामगिरी केली तर नवल वाटायला नको. तर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि रिचर्ड ग्लीसन यांच्यापासून भारतीय फलंदाजांना सावधगिरी बाळगावी लागेल. शेवटच्या सामन्यात भारतीय संघात कोणते बदल होतील, याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.
हेही वाचा – Ind vs Eng 2nd T20 : रोहित सेनेचा आणखी एक पराक्रम; सामन्यासह मालिकाही घातली खिशात
संभाव्य भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सुर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविंद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल.
इंग्लंडचा संभाव्य संघ: जेसन रॉय, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), डेव्हिड मलान, लियाम लिव्हिंगस्टोन, हॅरी ब्रुक, मोईन अली, सॅम कुरेन, डेव्हिड विली, क्रिस जॉर्डन, रिचर्ड ग्लीसन, मॅट पार्किंसन.