Ben Stokes raise question on umpire’s call : राजकोट येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाने इंग्लंडचा ४३४ धावांनी पराभव केला. पाच सामन्यांच्या मालिकेतील इंग्लंडचा हा सलग दुसरा पराभव ठरला. यापूर्वी विशाखापट्टणम येथे झालेल्या कसोटीतही इंग्लिश संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. आता राजकोटमधील पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने डीआरएसच्या ‘अंपायर्स कॉल’वर प्रश्न उपस्थित केले आहेत.
इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स म्हणाला की ‘अंपायर्स कॉल’ काढून टाकला पाहिजे. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात झॅक क्रॉऊलीला वादग्रस्त पद्धीतने आऊट घोषित केल्यानंतर स्टोक्सने ‘अंपायर कॉल’ काढून टाकण्याची मागणी केली आहे. क्रॉऊलीला बुमराहने एलबीडब्ल्यू आऊट केले, त्यानंतर अंपायरने त्याला आऊट दिले. यानंतर क्रॉऊलीने पंचांच्या निर्णयाला आव्हान देत रिव्ह्यू घेतला. यानंतर रिप्लेमध्ये दिसले की चेंडू स्टंपला लागला नव्हता, परंतु तरीही तो ‘अंपायर कॉल’ मानला गेला आणि क्रॉऊलीला क्रीज सोडावे लागले.
झॅक क्रॉऊलीच्या विकेटवरुन वाद –
यानंतर पंचांच्या डीआरएस निर्णयाबद्दल बेन स्टोक्स आणि मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने सामनाधिकारी जेफ क्रो यांच्याशीही चर्चा केली. सामन्यानंतर बोलताना बेन स्टोक्स म्हणाला, ‘झॅक क्रॉऊलीच्या डीआरएसबाबत आम्हाला काही स्पष्टता हवी होती. रिप्लेमध्ये, चेंडू यष्टीच्या बाहेर असल्याचे स्पष्टपणे दिसत होते. त्यामुळे आम्हाला हॉकआयकडून अजून स्पष्टता हवी होती. पंच म्हणाले की आकड्यांनुसार चेंडू यष्टीवर आदळत होता, परंतु ‘प्रक्षेपण’ चुकीचे होते. याचा अर्थ मला माहित नाही. काहीतरी चूक झाली, मी दोष देत आहे असे नाही. पण हे काय चालले आहे?’
हेही वाचा – IND vs ENG : ‘त्याला पाहून मला युवा सचिन तेंडुलकरची आठवण येते’, रवी शास्त्रीकडून भारतीय फलंदाजाचे कौतुक
अंपायर्स कॉल’ नियम हटवण्याची मागणी –
बेन स्टोक्स पुढे म्हणाला, “मला वैयक्तिकरित्या वाटते की ‘अंपायर्स कॉल’ नियम काढून टाकला पाहिजे. जर चेंडू यष्टीवर आदळेल असे वाटते, तर तो यष्टीवर आदळच असणार. खेळाचे नियम प्रत्येकासाठी समान असले पाहिजे.”
हेही वाचा – IND vs ENG : रोहित शर्माने खेळपट्टीबाबत टीकाकारांची बोलती केली बंद; म्हणाला, ‘आम्ही कोणत्याही खेळपट्टीवर…’
राजकोटमध्ये नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी करत ४४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा पहिला डाव ३१९ धावांवर आटोपला. पहिल्या डावाच्या आधारे भारताकडे दुसऱ्या डावात १२६ धावांची आघाडी होती. त्यानंतर भारताने ४ बाद ४३० धावा करून दुसरा डाव घोषित केला. एकूण आघाडी ५५६ धावांची झाली. यानंतर ५५७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव १२२ धावांवर आटोपला. मालिकेतील चौथा सामना २३ फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे.