Ind vs Eng : इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटीत इंग्लंडला विजयासाठी एकूण ५२१ धावांची गरज आहे. मात्र उपहारापर्यंत इंग्लंडचे ४ बळी टिपण्यात भारताला यश आले. या बळींमध्ये इशांत शर्माने आज दुसऱ्या डावात इंग्लंडचा अनुभवी फलंदाज अॅलिस्टर कूक याला बाद केले. कूकने १७ धावा केल्या आणि तो राहुलकडे झेल देत बाद झाला. पहिल्या डावातही कूकला इशांतनेच तंबूचा रस्ता दाखवला होता. या बरोबर इशांतने कसोटीत ११व्यांदा कूकला बाद करण्याचा पराक्रम केला.
या मालिकेत इशांत शर्माने ३ सामन्यातील ५ डावात ११ गडी बाद केले आहेत. यापैकी तीन डावात त्याने अॅलिस्टर कूकला बाद केले आहे. कारकिर्दीत तब्बल ११वेळा इशांत शर्माने या खेळाडूला तंबुत पाठवले आहे.
इशांत ‘या’ विक्रमाच्या जवळ
यापूर्वी एखाद्या ठराविक फलंदाजाला सर्वाधिक वेळा बाद करण्याचा पराक्रम भारतीय खेळाडूंमध्ये कपिल देव आणि हरभजन सिंग या दोघांच्या नावे आहे. कपिल देवने मुदसर नजरला १२ वेळा तर ग्रॅम गुचला ११वेळा बाद केले आहे. याशिवाय कपिलने डेविड गोव्हर, अॅलन बाॅर्डर आणि माल्कम मार्शल यांना १० वेळा बाद केले आहे. तर हरभजन सिंगने रिकी पाॅटिंगला १०वेळा बाद केले आहे. त्यामुळे जर या मालिकेत इशांतने राहिलेल्या ४ डावात कूकला दोन वेळा बाद केले, तर तो कपिलचा विक्रम मोडू शकेल. इशांत शर्मापेक्षा जास्त वेळा केवळ माॅर्ने माॅर्केलने अॅलिस्टर कूकला बाद केले आहे. त्याने ही करामत १२ वेळा केली आहे. तर आर. अश्विनने ९वेळा कूकला बाद केले आहे.