रवि पत्की – sachoten@hotmail.com
साऊथहॅम्पटन कसोटीत इंग्लंडच्या २४६ धावा झाल्या आहेत. काल ज्या कंडिशन्स होत्या (खेळपट्टी, ढगाळ हवा, भारताची गोलंदाजी) पहाता २४६ धावा ठीकठाक म्हणता येतील. ८६/६ वरून २४६ पर्यंत पोहचल्याने इंग्लंडला सामन्यात आपण टिकून असल्याची भावना असेल. भारतीय ड्रेसिंग रूममध्ये या धावा कशा पार करायच्या यावर मंथन चालू असेल. या अवघड कंडिशन्समध्ये धावा करण्याचे काही मार्ग असे असू शकतील.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१) थर्डमॅनला मिळणाऱ्या धावा:

चेंडू कोणत्या दिशेने स्विंग होईल याचा अंदाज १०० टक्के करता येत नसल्याने अनेक फलंदाज ऑफस्टम्पच्या आसपासच्या चेंडूना न सोडता बॅट हलकी पकडून भले कड लागेल पण थर्डमनॅला धावा मिळतील अशी रणनिती वापरताना दिसत आहेत. त्यात जोखीम आहे पण या मालिकेत फलंदाजांनी केलेल्या धावात थर्डमॅनचा वाटा मोठा आहे. कॅलक्युलेटेड एजेस लागून किंवा स्टीअर करून विनासायास ११ जणात मिळून ६०-७० धावा झाल्या आणि बदल्यात दोन फलंदाज बाद झाले तर सौदा घाट्याचा नाही.

२) अपारंपारिक फलंदाजी:

चेंडू जेव्हा इतका स्विंग आणि सीम होतो तेव्हा खूप पुस्तकी तंत्राने खेळण्यापेक्षा थोडी जोखीम घेऊन (काही वेळेस T20)सारखी फलंदाजी उपयोगी पडेल. फास्ट बॉलरला अचानक स्टेप आऊट होऊन लॉफटेड शॉट मारणे, ऑफ स्टंपच्या बाहेरच्या बॉलला हार्ड स्लॅश करणे, जागेवरून ओव्हरपिच बॉलला लॉफटेड शॉट मारणे वगैरे. सॅम करनने काल या रणनितीचा यशस्वी वापर केला. अशा अपारंपारिक फलंदाजीकरता रहाणे आणि पंडया उपयोगात आणता येतील. रहाणेचा नैसर्गिक खेळ इम्प्रोवायजेशनचा आहे तर पंड्या उंचावरून फटके लांब मारू शकतो. अर्थात यात जोखीम आहे. त्यामुळे यश मिळण्याकरता नशिबाचा भाग लागेल.

३) अवांतर धावा:

काल चेंडू विकेटकिपर कडे जाताना अचानक दिशा बदलताना दिसत होता. ऋषभ पंतला अनेक चेंडू पकडणे अशक्य होते. त्यामुळे  इंग्लंडला २२ बाईज मिळाल्या. भारताने काल खेळ संपताना फलंदाजी करून चार षटकात १९ धावा केल्या त्यात सुध्दा चार बाईज आहेत. कठीण परिस्थितीत अवांतर धावांचे १० ते १५ टक्के  योगदान मोठेच आहे.

४) मोईन अलीकडून धावा वसूल करणे:

अँडरसन, ब्रॉड, स्टोक्स यांचा मारा स्वैर होण्याची शक्यता कमी. त्यामुळे अगदी त्यांना विकेट मिळाल्याच नाहीत तर मोईनला गोलंदाजी मिळेल. त्याच्या गोलंदाजीवर जास्तीत जास्त धावा काढणे महत्वाचे. सॅम करन नवखा आहे. त्याला त्याचे इनस्विंगर कसे टाकता येणार नाहीत अशी रणनीती आखावी लागेल.

इंग्लंडमध्ये धावा व्हायला तंत्रापेक्षा नशीब लागते असा विश्वास दृढ होत चालला आहे. विकेट पडल्यावर त्याच्या तांत्रिक बाबींवर तासनतास बोलता येते. ते ऐकण्यात खूप आनंदही मिळतो.पण आऊट होणे आणि न  होणे यात अंतर असते एका क्षणाचे. इंग्लंडमध्ये तर अर्ध्या क्षणाचे. असे चेंडू पडतात की आऊट व्हावेच लागते. (म्हणून तीसपेक्षा अधिक शतके करणाऱ्या ऍलिस्टर कुकचे कौतुक वाटते.) फलंदाजी रिफ्लेक्स ऍक्शन वर होते. फलंदाज अंतरज्ञानी असला तरच तो बाद होणार नाही. क्रिकेटमध्ये बाद होणे अनिवार्य आहे. कधी फलंदाजाला अशक्यप्राय चेंडू पडतो तर कधी त्याचा निर्णय चुकतो. साऊथहॅम्प्टनला भारताला नशिबाची भरघोस साथ मिळो.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs eng 4th test indian team options to score runs blog by ravi patki