James Anderson became the first fast bowler to take 700 wickets in Tests : इंग्लंडचा वेगवान स्टार जेम्स अँडरसनने कसोटी क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ७०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. भारताविरुद्धच्या धरमशाला कसोटीच्या तिसऱ्या दिवशी त्याने ही कामगिरी केली. जेम्स अँडरसनची ७००वी विकेट कुलदीप यादव ठरला. विशेष बाब म्हणजे जेम्स अँडरसन हा ७०० कसोटी विकेट्सचा एव्हरेस्ट गाठणारा पहिला वेगवान गोलंदाज आहे. त्याचबरोबर एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे.
भारताविरुद्धची ही कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच जेम्स अँडरसन हा इतिहास रचेल, अशी अपेक्षा होती. ही मालिका सुरू होण्यापूर्वी जेम्स अँडरसनच्या खात्यात ६९० कसोटी विकेट्स होत्या. हैदराबादमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. तो विशाखापट्टणम कसोटीत खेळायला आला होता, जिथे त्याने ५ विकेट्स घेतल्या होत्या. यानंतर जेम्स अँडरसनने राजकोट कसोटीत एक विकेट घेतली, येथे तो पूर्णपणे निष्प्रभ ठरला. त्यानंतर रांचीमध्ये त्याने २ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचबरोबर पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शुबमन गिल जेम्स अँडरसनचा ६९९ वा बळी होता.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –
१. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका १९९२-२०१०): १३३ कसोटी – ८०० विकेट्स
२. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया १९९२-२००७): १४५ कसोटी – ७०८ विकेट्स
३. जेम्स अँडरसन (इंग्लंड २००३-२०२४): १८७* कसोटी – ७००* विकेट्स
४. अनिल कुंबळे (भारत १९९०-२००८): १३२ कसोटी – ६१९ विकेट्स
५. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड २००७-२०२३): १६७ कसोटी – ६०४ विकेट्स
६. ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया १९९३-२००७): १२४ कसोटी – ५६३ विकेट्स
जेम्स अँडरसनची क्रिकेट कारकीर्द –
जेम्स अँडरसनने २००३ मध्ये लॉर्ड्सवर झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून तो १८७* सामने खेळला आहे. फक्त क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने अँडरसनपेक्षा जास्त कसोटी सामने खेळले आहेत. सचिनच्या नावावर २०० कसोटी सामने आहेत. जेम्स अँडरसनने आतापर्यंत १९४ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याच्या नावावर २६९ विकेट्स आहेत. त्याने १९ टी-२० सामन्यांमध्ये १८ विकेट्स घेतल्या आहेत.