IND vs ENG 5th Test Match Updates : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना आजपासून सुरू झाला आहे. धर्मशाला येथे हा सामना सुरू आहे. दरम्यान, आज इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला स्टोक्सचा निर्णय योग्य असल्याचे वाटत होते, पण कर्णधार रोहित शर्माने गोलंदाजी फिरकीपटूंकडे सोपवल्यानंतर बरेच काही बदलले. दरम्यान, कुलदीप यादवच्या चेंडूवर शुबमन गिलने अप्रतिम झेल घेतला. हे पाहून नुकत्याच खेळलेल्या एकदिवसीय विश्वचषक फायनलचीही आठवण झाली.
इंग्लंड संघाला मिळाली चांगली सुरुवात –
वास्तविक, नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॉऊली आणि बेन डकेट फलंदाजीला आले. सकाळच्या ओलाव्याचा फायदा घेत भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज भारताला काही यश मिळवून देऊ शकतील, अशी अपेक्षा होती, पण तसे झाले नाही. दोन्ही सलामीवीर आरामात धावा करत राहिले. बुमराह आणि सिराजने अत्यंत टिच्चून गोलंदाजी केली असली, तरी इंग्लंडचे फलंदाजांनी त्यांचा संयमाने सामना केला. यानंतर कर्णधार रोहितने १००वी कसोटी खेळत असलेल्या अश्विनकडे गोलंदाजीची धुरा सोपवली. दुसरीकडे कुलदीप यादवने पदभार स्वीकारला.
शुबमनने डकेटचा घेतला अप्रतिम झेल –
कुलदीप यादवने सामन्यातील १८ वे षटक टाकताना इंग्लंडला पहिला धक्का दिला. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बेन डकेट कुलदीपसमोर होता. डकेटने याआधी काही डॉट बॉल खेळले होते, त्यामुळे त्याला धावा करण्याची घाई होती. कुलदीपच्या लेग साइड गुगलीवर डकेटने आक्रमक शॉट खेळला. चेंडू ऑफ-साइडवर हवेत गेला, तिथे कव्हरवरून उजवीकडे उलटे धावत जाऊन शुबमन गिलने डायव्हिंग करत शानदार झेल घेतला. बेन डकेटने बाद होण्यापूर्वी ५८ चेंडूत २७ धावा केल्या, ज्यात चार चौकारांचा समावेश होता.
हेही वाचा – VIDEO : बांगलादेश-श्रीलंका सामन्यात मोठा गदारोळ, तिसऱ्या पंचांच्या निर्णयावर संतापले श्रीलंकन खेळाडू
ट्रॅव्हिस हेडने विश्वचषक फायनलमध्ये रोहितचा असाच झेल पकडला होता –
शुबमन गिलने झेल घेताच संपूर्ण भारतीय संघाने त्याला घेरले आणि आनंद साजरा करण्यास सुरुवात केली. अशा प्रकारे कुलदीप यादवच्या चेंडूवर भारताला पहिले यश मिळाले. याआधी तुम्हाला आठवत असेल की आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडने असाच झेल पकडला होता, ज्यावर भारताचा सलामीवीर आणि कर्णधार रोहित शर्मा बाद झाला होता. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाला ३० धावांवर शुबमन गिलच्या रूपाने पहिला धक्का बसला होता.
हेही वाचा – IND vs ENG 5th Test : १००वी कसोटी खेळणारा अश्विन ठरला १४वा भारतीय, टीम इंडियाने दिला ‘गार्ड ऑफ ऑनर’
मात्र दुसऱ्या टोकाकडून रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत होता. त्याने ३० चेंडूत ४७ धावा केल्या होत्या. पण यानंतर रोहितने ग्लेन मॅक्सवेलच्या एका चेंडूवर पुन्हा मोठा फटका खेळला, यानंतर तो ट्रॅव्हिस हेडच्या हाती झेलबाद झाला. यानंतर भारतीय दडपणाखाली आले आणि सामना गमवावा लागला. त्या झेलची फायनलनंतर बरेच दिवस चर्चा रंगली होती. शुबमन गिलने ट्रॅव्हिस हेडप्रमाणे धावत जाऊन झेल पकडला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्याबद्दल बोलायचे, तर इंग्लंडला १३७ धावांवर तिसरा धक्का बसला. कुलदीप यादवने झॅक क्रॉऊलीला क्लीन बोल्ड केले. त्याला ७९ धावा करता आल्या. आपल्या खेळीत त्याने ११ चौकार आणि १ षटकार लगावला. ७० धावांच्या आसपास क्रॉऊली कसोटीत बाद होण्याची ही सहावी वेळ आहे. भारताविरुद्ध त्याची ही तिसरी वेळ आहे. सध्या १०० वी कसोटी खेळणारे जॉनी बेअरस्टो आणि जो रूट क्रीझवर आहेत.