Rohit Sharma Did not Listen To Sarfraz Khan for DRS : धरमशाला येथे भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेतील पाचवा सामना खेळला जात आहे. या सामन्यात इंग्लंडचा संघ प्रथम खेळायला आला आणि त्याची सुरुवातही चांगली झाली. मात्र कुलदीप यादवने दोन विकेट घेताच इंग्लंडच्या डावाची पडझड सुरु झाली. उपाहारापर्यंत इंग्लंडची धावसंख्या २ बाद १०० धावा होती. उपाहारानंतर भारताला तिसरी विकेट मिळू शकली असती, पण रोहित शर्माने मोठी चूक केली. खरं तर सर्फराझ खान रोहित शर्माला रिव्ह्यू घ्यायला सांगत होता. मात्र, रोहितने त्याचे ऐकले नाही त्याचा फटका टीम इंडियाला बसला.
रोहित शर्माने सर्फराझचे ऐकले नाही –
पाचव्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहारापर्यंत इंग्लंड संघाने दोन गडी गमावून १०० धावा केल्या होत्या. उपाहारानंतर दुसऱ्याच चेंडूवर भारताला विकेट मिळू शकली असती. कारण २५व्या षटकातील पाचवा चेंडू क्रॉऊलीच्या बॅटची कडा घेऊन जुरेलकडे गेला पण त्याच्या हातून निसटला, पण सर्फराझ खानने चेंडू शॉट लेगवर पकडला. सर्फराझचे म्हणणे होते की चेंडू बॅटला लागला आहे, त्याने रोहित शर्माला डीआरएस घेण्यास सांगितले.
रोहितला विश्वास बसला नाही, त्याने जुरेलला याबाबत विचारले. जुरेलने सांगितले की, चेंडू बॅटला लागला असे मला वाटत नाही. त्यामुळे रोहितने डीआरएस घेतला नाही. मात्र, रिप्लेमध्ये चेंडू क्रॉऊलीच्या बॅटला लागल्याचे दिसून आले. यानंतर तो आऊट असल्याचे रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर रोहित शर्मा हसताना दिसला. त्यानेही सर्फराझकडे पाहून हातवारे केले. त्यावेळी सर्फराझ खानही हसू लागला.
डीआरएसवरून टीम इंडियाचा गोंधळ –
यानंतर ३२ व्या षटकात पुन्हा एकदा अशीच परिस्थिती निर्माण झाली. यावेळी जुरेलने विकेटच्या मागे झेल घेत आऊट असल्याची अपील केली. यावेळी रोहितने सर्फराझ खानला रिव्ह्यूसाठी विचारले, परंतु सर्फराझ खानने हात वर केले. तसेच त्याने हातवारे करुन सांगितले की यावेळी त्याला माहित नाही. तसेच गोलंदाजी करणाऱ्या जसप्रीत बुमराहलाही रिव्ह्यूबाबत आत्मविश्वास नव्हता. रोहितने रिव्ह्यू घेतला नाही. मात्र यावेळी त्याचा रिव्ह्यू न घेण्याचा निर्णय योग्य ठरला.
भारताच्या फिरकीसमोर इंग्लंडची दमछाक –
पहिल्या दिवसअखेर कर्णधार रोहित शर्मा ५२ धावांवर नाबाद आणि शुबमन गिल २६ धावांवर नाबाद परतले होते. दोघांमध्ये ३१ धावांची भागीदारी झाली होती. भारतीय संघाला एकमेव धक्का यशस्वी जैस्वालच्या रूपाने बसला. तो ५८ चेंडूत ५७ धावा करून बाद झाला. त्याला शोएब बशीरने यष्टिरक्षक बेन फॉक्सकरवी यष्टिचित केले. तत्पूर्वी, इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर आटोपला. कुलदीप यादवने पाच विकेट घेतल्या. त्याच वेळी, रविचंद्रन अश्विनने १०० वा कसोटी खेळताना चार विकेट घेतल्या. इंग्लंडकडून झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७९ धावा केल्या. याशिवाय रवींद्र जडेजाला एक विकेट मिळाली. इंग्लंडच्या सर्व १० विकेट्स भारतीय फिरकीपटूंनी घेतल्या.