IND vs ENG Aakash Chopra on Shivam Dube : भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळली जाणार आहे. प्रथम, दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जाईल. या मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला होणार आहे. याबाबत टीम इंडियाची घोषणा आधीच करण्यात आली आहे. ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा स्टार खेळाडू शिवम दुबेला संधी मिळाली नाही. त्यामुळे भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्राने प्रश्न उपस्थित केले आहेत.
शिवम दुबेला संघात संधी मिळाली नाही –
शिवम दुबेची इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात निवड झालेली नाही. मात्र, २०२४ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत दुबे टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग होता. त्याने फायनल सामन्यातही चांगली खेळी केली होती. आता माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने शिवम दुबेची इंग्लंडसोबतच्या टी-२० मालिकेसाठी टीम इंडियात निवड न केल्याने निवडसमितीच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आकाश चोप्रा काय म्हणाला?
आकाश चोप्रा आपल्या यूट्यूब चॅनलवर म्हणाला की, “शिवम दुबेचे काय झालं? मला ऋतुराज (गायकवाड) बद्दलही बोलायचं होतं, परंतु तो आपली जागा बनवू शकला नाही. रजत पाटीदार देखील आहे. साहजिकच, बरेच फलंदाज आहेत. पण आता मी शिवम दुबेवर थोडे लक्ष केंद्रित करणार आहे. तो टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य होता.” शिवाय, चोप्राने स्पर्धेच्या फायनल सामन्यात दुबेच्या मौल्यवान योगदानाचा उल्लेख केला. जिथे त्याने १६ चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार मारत २७ धावा केल्या होत्या.
आकाश चोप्रा पुढे म्हणाला, “जेव्हा तुम्ही जिंकता, तेव्हा प्रत्येकाला श्रेय मिळायला हवे. तो फायनलमध्येही चांगला खेळला होता. याआधी नक्कीच काही प्रश्न होते की तो क्षेत्ररक्षण किंवा फलंदाजी चांगली करत नाही. मात्र, नंतर तो चांगला खेळला आणि टी-२० विश्वचषक चॅम्पियन ठरला.”
शिवम दुबेची कामगिरी –
शिवम दुबेने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४-२५ मध्ये मुंबईसाठी चांगली कामगिरी केली होती. त्याने पाच डावात ७५.५० च्या सरासरीने आणि १७९.७६ च्या प्रभावी स्ट्राइक रेटने १५१ धावा केल्या. ज्यामध्ये सर्व्हिसेसविरुद्ध ३७ चेंडूत नाबाद ७१ धावा ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. आतापर्यंत त्याच्या टी-२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत, दुबेने २४ डावांमध्ये २९.८६ च्या सरासरीने ४४८ धावा केल्या आहेत, ज्यात त्याच्या नावावर तीन अर्धशतकांचा समावेश आहे. गोलंदाजीत त्याने २३ डावात ११ विकेट्स घेतल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd