IND vs ENG Abhishek Sharma break Rohit Sharma sixes record : वानखेडेवर खेळल्या गेलेल्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताने अभिषेक शर्माच्या विक्रम १३५ धावांच्या जोरावर इंग्लंडचा १५० धावांनी दारुण पराभव केला. त्याचबरोबर पाच सामन्यांच्या मालिका ४-१ ने खिशात घातली. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद २४७ धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला ११ व्या षटकात ९७ धावांत गुंडाळले. दरम्यान अभिषेक शर्माने विक्रमी शतकासह रोहित शर्माचा ८ वर्षांनंतर सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला.
अभिषेक शर्माने भारतीय डावाच्या अकराव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अवघ्या ३७ चेंडूत शतक पूर्ण केले. अशाप्रकारे, टी-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावणारा तो रोहित शर्मानंतरचा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. यासह अभिषेकने रोहित शर्माचा सर्वात वेगवान शतक झळकावण्याचा विक्रम अवघ्या ३ चेंडूंनी हुकला. रोहितने ३५ चेंडूत सर्वात जलद शतक झळकावण्याचा पराक्रम केला आहे.
अभिषेकने रोहितचा विक्रम केला उद्ध्वस्त –
अभिषेकने आपले शतक पूर्ण केल्यानंतर एका टोकाकडून विकेट पडू लागल्यानंतर धावांचा वेग थोडा मंदावला. असे असतानाही युवा फलंदाज ५४ चेंडूत १३५ धावा करू शकला. आपल्या झंझावाती शतकी खेळीत त्याने केवळ ७ चौकार आणि १३ गगनचुंबी षटकार लगावले. अशा प्रकारे तो टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला. अभिषेकने रोहित शर्माचा ८ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला. २०१७ मध्ये इंदूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-२० सामन्यात रोहितने आपल्या डावात १० षटकार मारले होते.
टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये एका डावात सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज :
१३ अभिषेक शर्मा विरुद्ध इंग्लंड, वानखेडे २०२५
१० रोहित शर्मा विरुद्ध श्रीलंका, इंदूर २०१७
१० संजू सॅमसन विरुद्ध दक्षिण आफ्रिका, डर्बन २०२४
१० तिलक वर्मा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, जोहान्सबर्ग २०२४
अभिषेकने मोडला शुबमनचा विक्रम –
अभिषेक शर्माची १३५ धावांची खेळी ही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याही भारतीय फलंदाजाने केलेली सर्वोच्च खेळी आहे. अभिषेकने शुबमन गिलचा विक्रम मोडला. याआधी गिलच्या बॅटमधून सर्वात मोठी खेळी झाली होती. गिलने २०२३ साली न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात नाबाद १२६ धावा केल्या होत्या.