भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांसाठी भारताकडून संघ जाहीर करण्यात आला. या संघात भारताकडून मुंबईकर पृथ्वी शॉ आणि आंध्र प्रदेशाचा कर्णधार हनुमा विहारी याला संघात स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघाच्या निवड समितीची आज नॉटिंगहॅम येथे बैठक झाली. या बैठकीत हा निणर्य घेण्यात आला. बीसीसीआयने याबाबत टि्वट करून माहिती दिली आहे. सलामीवीर मुरली विजय आणि फिरकीपटू कुलदीप यादव यांना या संघातून वगळण्यात आले आहे.
#TeamIndia for the last two Tests against England, India A squad for four-day matches announced.
Prithvi Shaw and Hanuma Vihari included in India’s 18-man squad; Shreyas Iyer to lead India A.
Full details here – https://t.co/inudPXJGa8 pic.twitter.com/YFxoxchDEz
— BCCI (@BCCI) August 22, 2018
भारतीय संघ – विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), करूण नायर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, हार्दीक पांड्या, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमरा, शार्दूल ठाकूर, हनुमा विहारी
उर्वरित २ कसोटी सामन्यांपैकी चौथा कसोटी सामना ३० ऑगस्टपासून साऊथहॅप्टन येथे होणार आहे. तर पाचवा आणि अंतिम सामना लंडन येथे होणार आहे. याशिवाय, ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध होणाऱ्या चार दिवसीय सामन्यांसाठीही भारत अ संघाची घोषणा करण्यात आली. या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर याच्याकडे देण्यात आले आहे.
भारतीय संघाची तिसऱ्या कसोटी सामन्यातील कामगिरी पाहता विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि हार्दीक पांड्या वगळता इतर फलंदाजांना आपली छाप उमटवता आलेली नाही. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल हे अद्यापही मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाच्या जागी पृथ्वी शॉ याला अंतिम संघात स्थान मिळते का हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हनुमा विहारी हा अष्टपैलू खेळाडू आहे. नुकत्याच झालेल्या दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या सामन्यात हनुमाने ५४ धावांची केली. त्याशिवाय याच संघाविरुद्ध झालेल्या अनौपचारिक कसोटी सामन्यात त्याने १४८ धावांची जोरदार खेळी होती. त्याच्या या कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय, तो ऑफस्पिनर गोलंदाजही आहे. सध्या फिरकीपटू अश्विन हा दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे जर पुढील सामन्यापर्यंत तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला नाही, तर त्याच्या जागी अंतिम संघात हनुमाचा समावेश करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.