भारत आणि इंग्लंड याच्यातील पाचवा आणि निर्णायक कसोटी सामना आता अंतिम टप्प्यात आला आहे. आज या सामन्याचा पाचवा दिवस आहे. यजमान इंग्लंडला विजयासाठी केवळ ११९ धावांची आवश्यकता आणि हातात सात गडी शिल्लक आहेत. ही परिस्थिती बघता इंग्लंडचा संघ मजबुत स्थितीमध्ये आहे. आज भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा केला नाही तर पहिल्या सत्रामध्ये इंग्लंड हा सामना जिंकण्याची शक्यता आहे. म्हणून, भारतीय चाहत्यांनी आता पावसाला साकडे घालण्यास सुरुवात केली आहे. सोशल मीडियावर याबाबत भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.
चौथ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. त्यामुळे विजयासाठी मिळालेले ३७८ धावांचे लक्ष्य ते सहज पार करतील, अशी स्थिती निर्माण झाली. त्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर चाहत्यांच्या मीम्सचा पाऊस पडला. आता पाचव्या दिवशी बर्मिंगहॅममध्ये जोरदार पाऊस पडावा, अशी प्रार्थना भारतीय चाहत्यांनी सुरू केली आहे.
भारतीय गोलंदाजांवर विश्वास न ठेवता चाहते पावसाची अपेक्षा करत आहेत. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाजांची कामगिरी याला जबाबदार आहे. इंग्लंडच्या खेळाडूंनी एकापाठोपाठ एक भागीदारी करत सामन्याचे चित्र फिरवले. चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज पूर्णपणे असहाय्य दिसत होते.
हा सामना अनिर्णित राहिला तर मालिकेत २-१ ने आघाडीवर असलेला भारतीय संघ ही मालिका जिंकेल. पण, शेवटचा सामना जिंकण्यात इंग्लंडला यश आले तर ही मालिका २-२ अशी बरोबरीत राहील.