Ravindra Jadeja Century : भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या अर्धवट राहिलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळवला जात आहे. बर्मिंगहॅममधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियमवरती हा सामना सुरू आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय संघाच्या डावाची सुरुवात अतिशय वाईट झाली. १०० धावांच्या आतच सुरुवातीचे पाच फलंदाज तंबूत परतले. त्यामुळे भारतीय संघ मोठ्या संकटात सापडला होता. मात्र, उपकर्णधार ऋषभ पंत आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत डावाला आकार दिला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी रविंद्र जडेजाने शानदार शतक झळकावले.

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने कसोटीच्या दुसऱ्या दिवशी शानदार शतक झळकावून इतिहास रचला. जडेजाने १८३ चेंडूत १३ चौकारांच्या मदतीने आपले शतक पूर्ण केले. त्याचे हे कसोटी कारकिर्दीतील तिसरे आणि परदेशी भूमीवरील पहिले शतक ठरले आहे. शतक पूर्ण केल्यानंतर त्याला जास्त काळ मैदानावरती थांबता आले नाही. जेम्स अँडरसनने त्याला त्रिफळाचित करून तंबूत माघारी धाडले.

यापूर्वी जडेजाने २०१८ मध्ये राजकोटमध्ये विंडीजविरुद्ध आणि मार्च २०२२ मध्ये मोहालीत श्रीलंकेविरुद्ध कसोटी शतक झळकावले होते. या शतकाबरोबरच जडेजाने इंग्लंडमध्ये ५००कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. इंग्लंडमधील ११ कसोटी सामन्यांमध्ये जडेजाने ३०पेक्षा जास्त सरासरीने ही कामगिरी केली आहे. यापूर्वी, इंग्लंडमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ८६ होती.

जडेजाने शतक पूर्ण करताच या सामन्यात भारतीय संघाच्या नावावर एक अनोखी कामगिरीची नोंद झाली आहे. भारताकडून एकाच कसोटी डावात दोन डावखुऱ्या फलंदाजांनी शतके ठोकण्याची ही तिसरी वेळ आहे. या सामन्यात जडेजाच्या आधी डावखुऱ्या ऋषभ पंतनेही शतक झळकावले होते. पंत सामन्याच्या पहिल्या दिवशी १४६ धावांची खेळी केली.

Story img Loader